युद्धातील बालकैदी ते देशाचं नेतृत्व; तारिक रहमान यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास

बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने बांग्लादेशच्या 13 व्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवत दोन तृतियांशपेक्षा अधिक बहुमत मिळवले.

  • Written By: Published:
Untitled Design 34

Tariq Rahman’s political journey so far : तारिक रहमान आता बांगलादेशचे नवे पंतप्रधान होण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. तारिक रहमान यांच्य नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने बांग्लादेशच्या 13 व्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवत दोन तृतियांशपेक्षा अधिक बहुमत मिळवले आहे. दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या कुटुंबाचे ते केवळ वारसदार नाहीत, तर सध्याच्या घडीला देशातील सर्वात प्रभावी नेता म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. ज्या बांगलादेशातून त्यांना तब्बल 17 वर्षे निर्वासित जीवन जगावे लागले, त्याच देशाचे नेतृत्व आता त्यांच्या हाती येणार आहे.

कोण आहेत तारिक रहमान

तारिक रहमान यांना बांग्लादेशच्या राजकारणात तारिक झिया म्हणून देखील ओळखले जाते. त्यांचे राजकीय अस्तित्व मोठ्या प्रमाणात त्यांच्या कौटुंबिक वर्षाशी जोडलेले आहे. ते माजी राष्ट्रपती झीयाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत. 1967 साली त्यांचा जन्म झाला, तेव्हा बांगलादेशला पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखले जात होते. 1971 मधील बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या काळात ते केवळ चार वर्षांचे होते. त्या संघर्षादरम्यान त्यांना काही काळासाठी ताब्यात ठेवण्यात आले होते. त्यावेळी बीएनपी त्यांना युद्धातील सर्वात लहान वयाच्या बंद्यांपैकी एक म्हणून गौरवत होते.

त्यांचे वडील झियाउर रहमान हे लष्करातील कमांडर होते. 1975 मधील सत्तांतरानंतर त्यांनी हळूहळू सत्तेवर आपली पकड मजबूत केली. त्याच वर्षी बांगलादेशचे संस्थापक नेते शेख मुजबर रहमान यांची हत्या झाली. या घटनेनंतर झिया आणि शेख हसीना यांच्या कुटुंबांमध्ये दीर्घकाळ टिकणारा राजकीय संघर्ष निर्माण झाला. हा संघर्ष बेगमांची लढाई म्हणून ओळखला जाऊ लागला. विशेष म्हणजे, अनेक दशकांनंतर झालेल्या या निवडणुकीत दोन्ही ‘बेगम’ निवडणुकीच्या मैदानात नव्हत्या, खालिदा झिया यांचे निधन झाले आहे, तर शेख हसीना भारतात वास्तव्यास आहेत.

काही वर्षांनी झियाउर रहमान यांचीही हत्या झाली. त्यावेळी तारिक रहमान फक्त 15 वर्षांचे होते. त्यानंतर त्यांचे संगोपन आई खालिदा झिया यांच्या छायेखाली झाले. पुढे त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. सत्तेसाठी खालिदा झिया आणि शेख हसीना यांच्यातील संघर्ष अनेक वर्षे सुरूच राहिला. बीएनपीच्या माहितीनुसार, तारिक रहमान यांनी 23व्या वर्षी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ढाका विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंधांचा काही काळ अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी लष्करी शासक हुसेन मुहम्मद इर्शाद यांच्या विरोधातील आंदोलनात बीएनपीची साथ घेतली.

2007 मधील अटक आणि 2008 मधील देशत्याग

2007 साली भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगात असताना शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. काही अहवालांनुसार, राजकारणापासून दूर राहण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. 2008 साली उपचारासाठी ते लंडनला गेले आणि त्यानंतर ते बांगलादेशात परतले नाहीत.

2008 मध्ये शेख हसीना पुन्हा सत्तेत आल्यानंतर बीएनपीच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. 2018 मध्ये 2004 साली शेख हसीना यांच्या सभेवरील हल्ल्याच्या कटप्रकरणात तारिक रहमान यांना अनुपस्थितीत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बीएनपीने हे झिया कुटुंबाला कायमचे राजकारणातून दूर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.

ब्रिटनमध्ये वास्तव्यास असताना तारिक रहमान आपल्या पत्नी ज्या व्यवसायाने हृदयरोगतज्ज्ञ आहेत आणि मुलीसह जीवन व्यतीत करत होते. मात्र शेख हसीना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर आणि आईची प्रकृती खालावल्यावर त्यांनी पुन्हा बांगलादेशच्या राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली. खालिदा झिया यांच्या निधनानंतर त्यांची बीएनपी प्रमुख म्हणून निवड झाली. या भूमिकेत त्यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला. हा विजय केवळ तारिक रहमान यांचा नाही, तर त्यांनी खांद्यावर घेतलेल्या त्या राजकीय वारशाचा आहे, ज्याने बांगलादेशच्या राजकारणात अनेक दशके निर्णायक भूमिका बजावली आहे.

follow us