Telegram वर ‘लायर’ खरेदीसाठी चक्क 8.4 कोटींची बोली; CEO ड्युरोव्हही चक्रावले…

Telegram Username Auction एखादा महागडा फोन, आलिशान कार किंवा बंगला विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणं समजू शकतं. पण

  • Ninad K
  • Written By: Published:
Telegram @liar Username Auction

Telegram @liar Username Auction : फक्त चार अक्षरं… आणि किंमत तब्बल 8 कोटी 40 लाख रुपये… होय, डिजिटल जगात आता एका युजरनेमची किंमत आलिशान घर किंवा महागड्या गाडीइतकी झाली आहे. टेलिग्रामवरील @liar या युजरनेमसाठी चक्क 1 मिलियन डॉलरची, म्हणजेच जवळपास 8.4 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही ऑफर पाहून टेलिग्रामचे CEO पावेल ड्युरोव्ह यांनाही विश्वास बसत नाहीये. पण गंमत अशी की, ज्या युजरनेमचा अर्थच ‘खोटारडा’ असा होतो, त्याच नावाच्या युजरवर विश्वास ठेवायचा तरी कसा? ड्युरोव्ह यांनीही याच मुद्द्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. आता प्रश्न असा आहे की, टेलिग्रामवर एका युजरनेमला एवढी कोट्यवधींची किंमत का आली? आणि नेमका काय आहे हा युजरनेमचा करोडोंचा बाजार? समजून घेऊया…

टेलिग्रामवर युजरनेमचा बाजार भरतो कुठे?

खरंतर टेलिग्रामवर युजरनेम ही केवळ अकाउंट शोधण्याची ओळख राहिलेली नाही. काही खास युजरनेमची खरेदी-विक्रीही केली जाते. त्यासाठी टेलिग्रामशी संबंधित Fragment नावाचं मार्केटप्लेस उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर युजर्स विशिष्ट युजरनेम खरेदी करू शकतात आणि नंतर ते दुसऱ्याला विकूही शकतात. या व्यवहारांसाठी TON ब्लॉकचेनचा वापर केला जातो. त्यामुळे हे युजरनेम डिजिटल मालमत्तेप्रमाणे खरेदी-विक्री करता येतात.

आता या बाजारात कोणत्या युजरनेमला जास्त मागणी असते? तर, एक शब्द असलेली, छोटी आणि सहज लक्षात राहणारी नावं सर्वाधिक आकर्षक ठरतात. कारण अशा नावांमुळे एखाद्या व्यक्तीला किंवा ब्रँडला टेलिग्रामवर वेगळी ओळख निर्माण करता येते. @liar हे देखील असंच एक छोटं आणि लक्षात राहणारं नाव आहे.

विशेष म्हणजे, टेलिग्रामवर युजरनेमसाठी एवढी मोठी बोली लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी @pride या युजरनेमसाठी 2.56 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बोली लागल्याचं ड्युरोव्ह यांनी सांगितलं होतं. टेलिग्रामचे जगभरात एक अब्जाहून अधिक मासिक सक्रिय युजर्स असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे. या प्लॅटफॉर्मवर केवळ युजरनेमच नाही, तर, सिमकार्डशिवाय वापरता येणारे अनामिक फोन नंबरही Fragment वर उपलब्ध आहेत. म्हणजेच, डिजिटल जगात आता केवळ तुमचं नाव किंवा ओळखच नाही, तर तुमचा युजरनेमसुद्धा लाखों-कोट्यवधींची मालमत्ता ठरू शकतो.

follow us