‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर’मध्ये गोळीबार करणाऱ्याची ओळख समोर, कोण आहे 31 वर्षाचा तरुण?
पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी संशयित आरोपी ॲलन याला मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती असं संबोधलं.
अमेरिकेत ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स (America) डिनर’मध्ये शनिवारी (दि. २५) गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख पटली आहे. हल्लेखोराचं नाव कोल थॉमस ॲलन (वय ३१) असून तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. कोलने गोळीबार करून जगभरात खळबळ उडवून दिली आहे.
हल्ला हा पूर्वनियोजित कट
अमेरिकन फेडरल एजन्सींने दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय कोल थॉमस ॲलन याच्यावर गुन्ह्यादरम्यान शस्त्राचा वापर करणे, धोकादायक शस्त्राने पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर असणार्या हॉटेलमध्ये ॲलन हा पाहुणा म्हणून थांबलेला होता. त्यामुळेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भाषण करणार ठिकाणी तो सुरक्षेचा पहिला स्तर ओलांडून आतपर्यंत पोहोचू शकला. त्यामुळे हा हल्ला एक पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट होत आहे.
कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी
सोशल मीडियावरील माहितीनुसार, ॲलन हा एक खाजगी शिक्षक आणि हौशी व्हिडिओ गेम डेव्हलपर आहे. न्यूज एजन्सी ‘असोसिएटेड प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, मे २०२५ चा कोल थॉमस ॲलनचा प्रोफाईल फोटो हा अध्यक्ष ट्रम्प यांनी पोस्ट केलेल्या संशयित हल्लेखोराच्या फोटोशी मिळताजुळता आहे.त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलवर तो ‘कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी-डोमिंग्वेझ हिल्स’मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतल्याच्या पेहरावात दिसत आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी
कोल थॉमस ॲलन याने २०१७ मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (CalTech) मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली. यानंतर तो ख्रिश्चन स्टुडंट फेलोशिप आणि ‘नर्फ गन’ (Nerf guns) वापरणाऱ्या एका कॅम्पस ग्रुपमध्ये सक्रिय होता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात त्याने वृद्धांच्या मदतीसाठी नवीन तंत्रज्ञानावर काम केले होते. व्हीलचेअरसाठी एका नवीन प्रकारच्या इमर्जन्सी ब्रेकचा ‘प्रोटोटाइप’ विकसित केला होता.
‘टीचर ऑफ द मंथ’
ॲलनने २०२४ मध्ये कमला हॅरिस यांच्या अध्यक्षपदाच्या प्रचारासाठी डेमोक्रॅटिक पार्टीच्या पॉलिटिकल ॲक्शन कमिटीला २५ डॉलर्सची देणगी दिली होती. गेल्या सहा वर्षांपासून तो ‘C2 Education’ नावाच्या कंपनीत काम करत होता. ही कंपनी विद्यार्थ्यांना कॉलेज प्रवेश आणि परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन करते. २०२४ मध्ये याच कंपनीने त्याला ‘टीचर ऑफ द मंथ’ म्हणून गौरवले होते.ॲलनने ‘स्टीम’ (Steam) प्लॅटफॉर्मसाठी मॉलिक्युलर केमिस्ट्रीवर आधारित एक व्हिडिओ गेम विकसित केला होता आणि तो अंतराळातील युद्धावर आधारित एका नवीन ‘टॉप-डाउन शूटर’ गेमवर काम करत होता.
मानसिकदृष्ट्या आजारी
गोळीबाराच्या घटनेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी संशयित आरोपी ॲलन याला मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती असं संबोधलं. ट्रम्प म्हणाले की, या माणसाने अनेक शस्त्रांसह सुरक्षा चेकपोस्टवर धाव घेतली, परंतु सीक्रेट सर्व्हिसच्या शूर जवानांनी त्याला पकडले. यात एका अधिकाऱ्याला गोळी लागली, पण बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचा जीव वाचला. मी त्या अधिकाऱ्याशी बोललो आहे, त्याची प्रकृती आता ठीक आहे. संशयित आरोपीवर लवकरच अनेक गुन्हे दाखल केले जातील. हा माणूस कॅलिफोर्नियाचा असून अधिकारी त्याच्या अपार्टमेंटची झडती घेत आहेत. अशा घटना पुन्हा घडू शकतात, मात्र आम्ही अधिक सज्ज राहू.