सौदीवर हौथींच्या हल्ल्यांचा धोका वाढला, अमेरिकेकडून पश्चिम आशियासाठी ट्रॅव्हल अलर्ट जारी
अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराण समर्थित हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाविरोधात कारवाया केल्या असून नागरी विमानतळांनाही लक्ष्य केले आहे.
US issues travel alert for West Asia : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने रविवारी, 20 सप्टेंबर रोजी या भागात असलेल्या अमेरिकी नागरिकांसाठी महत्त्वाची सुरक्षा सूचना जारी केली आहे. पश्चिम आशियात असलेल्या अमेरिकी नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, तर या क्षेत्राबाहेर असलेल्या नागरिकांनी पश्चिम आशियात प्रवास करण्यापूर्वी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर यासंदर्भात माहिती दिली. संभाव्य विमान उड्डाणे रद्द होणे, प्रवासात अडथळे निर्माण होणे तसेच हवाई क्षेत्र अचानक बंद केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहावे, असे विभागाने म्हटले आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराण समर्थित हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाविरोधात कारवाया केल्या असून नागरी विमानतळांनाही लक्ष्य केले आहे. त्यामुळे या भागातील लष्करी संघर्ष आणखी वेगाने तीव्र होण्याची शक्यता असल्याचे सुरक्षा सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
पश्चिम आशियात प्रवास करणाऱ्या किंवा तेथून बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी विमानतळ आणि विमानसेवांच्या कामकाजासंदर्भातील ताज्या माहितीवर सातत्याने लक्ष ठेवावे, असेही अमेरिकेने सांगितले आहे. अमेरिकी राजनैतिक कार्यालयांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. इराण आणि त्याच्याशी संबंधित गट जगभरातील अमेरिकी हितसंबंधांना लक्ष्य करू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकी नागरिक, अमेरिकी व्यवसाय, संस्था आणि इतर ठिकाणांचा समावेश असू शकतो.
रशियाच्या राजधानीवर युक्रेनकडून ड्रोन हल्ले, निवडणुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचा रशियाचा आरोप
दरम्यान, सौदी अरेबियाने शनिवारी सांगितले की, येमेनमधील हौथी बंडखोरांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या माध्यमातून राजधानी रियाधवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने हा हल्ला निष्फळ केल्याचा दावा केला आहे. रियाधमधील काही नागरिकांनी स्फोटाचा मोठा आवाज ऐकल्याचे सांगितले, तर विमानतळाजवळ धुराचे लोटही दिसून आले. मात्र या घटनेत जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. हौथींनी लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील यानबू शहरातील नागरी पायाभूत सुविधांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचा सौदी अरेबियाचा दावा आहे. याशिवाय तैफ, बायश आणि फरासान भागातही हल्ल्यांचे प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले आहे.
हौथींनी रियाधमधील काही ‘संवेदनशील ठिकाणे’ तसेच यानबूमधील सौदी अरामकोच्या सुविधांना लक्ष्य केल्याचा दावा केला होता. मात्र या दाव्याला स्वतंत्र पुष्टी मिळालेली नाही. या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची चिंता निर्माण झाली असून, हवाई वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.