ज्याने देशाला चुना लावला, त्याला परदेशात पाठवलं; सौरव दासला मात्र अडवलं! अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल
Abhijit Dipke: सीजेपी नेते सौरव दास यांनी लंडनला जाण्यापासून विमानतळावरतच रोखण्यात आलं. त्यामुळे अभिजीत दिपके यांनी सरकारवर टीका केली.
Abhijit Dipke Slams Government Over Saurav Das Airport Row: कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य सौरव दास (Saurav Das) यांना लंडनला जाताना विमानतळावर अडवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेवरून कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी सौरव दास यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यामागचं कारण काय, असा सवाल उपस्थित केला. तसेच विजय मल्ल्या (Vijay Mallya) आणि नीरव मोदी (Nirav Modi) यांच्या उदाहरणांचा दाखला देत सरकारच्या भूमिकेवर टीका केली.
सौरव दास यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठित विद्यापीठात व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. भारतात कॉकरोच जनता पार्टीने केलेलं आंदोलन आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात मिळालेलं यश, या विषयावर त्यांना बोलायचं होतं. मात्र, लंडनला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना रोखण्यात आल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. सौरव दास यांना भारताबाहेर जाण्याची परवानगी का दिली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘सौरव दास यांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे त्यांनी कोणताही स्कॅम केलेला नाही’
यावेळी अभिजीत दिपके यांनी सरकारवर टीका करताना विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “सौरव दास यांची सगळ्यात मोठी चूक ही झाली की त्यांनी कोणताही स्कॅम केलेला नाहीये. जर सौरव दास यांनी एखादा मोठा स्कॅम केला असता, लोकांना चुना लावला असता, बँका लुटल्या असत्या, तर सौरव दास यांना पीआयटी क्लिअरन्स देण्यात आलं असतं. जसं विजय मल्ल्याला देण्यात आलं होतं.”
राम भक्त हनुमान साँग: अनुपम खेर यांचं नवं भक्तिगीत चर्चेत; मनाला भिडणारं गाणं रिलीज!
पुढे विजय मल्ल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, “हजारो कोटींचा घोटाळा करणारा विजय मल्ल्या हा विदेशात पळून जातो. त्याला मोदी सरकार अडवत नाही. आजही विजय मल्ल्याकडे सात हजार कोटी रुपयांचं कर्ज बाकी आहे. सौरवची ही चूक आहे की त्यांनी विजय मल्ल्यासारखा देशाला चुना लावला नाही, त्यामुळे त्याला अडवण्यात आलं.”
‘बँक लुटली असती तर व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन पाठवलं असतं’
नीरव मोदीचा उल्लेख करत अभिजीत दिपके यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “नीरव मोदी यानेही पीएनबी बँकेत हजारो कोटींचा घोटाळा केला. त्यालाही अडवलं नाही. त्याला मस्त व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन देशातून बाहेर पाठवलं. जर सौरव दास यांनीदेखील एखादी बँक लुटली असती, तर सरकारने त्यांनाही व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन परदेशात पाठवलं असतं,” अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
बेलापूर येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ; 10 जणांवर गुन्हा दाखल
सौरव दास यांना विमानतळावर रोखल्याचा आरोप करत अभिजीत दिपके यांनी एका भारतीय नागरिकाला परदेशात जाण्यापासून रोखण्याचं कारण सरकारने स्पष्ट करावं, अशी मागणी केली. या आरोपांवर सरकारकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे आता लक्ष लागलं आहे.