पुण्यात 100 विद्यार्थ्यांना मोफत MBA करण्याची संधी! ऑलकार्गो समूहाची 15 कोटींची गुंतवणूक; लॉजिस्टिक्स स्कूलची स्थापना
Free MBA Scholarships in Pune : पुण्यातील 100 विद्यार्थ्यांना लॉजिस्टिक्स क्षेत्रात MBA करण्याची संधी मिळणार आहे.
Free MBA Scholarships in Pune : पुण्यातील तरुणांसाठी उच्च शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ऑलकार्गो समूहाने सामाजिक बांधिलकी जपत फ्युएल स्किलटेक अँड आंत्रप्रेन्योरशिप युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या पुणे (Pune) कॅम्पसमध्ये ‘ऑलकार्गो स्कूल ऑफ लॉजिस्टिक्स’ची स्थापना करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी ऑलकार्गो समूहाने तब्बल 15 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. ग्रामीण आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना लॉजिस्टिक्स क्षेत्रातील जागतिक करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या संस्थेच्या माध्यमातून एकूण 100 पात्र विद्यार्थ्यांना लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन विषयातील दोन वर्षांचा MBA अभ्यासक्रम पूर्णपणे विनामूल्य शिकता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण शिष्यवृत्ती दिली जाणार असून, पहिल्या वर्षी 50 आणि दुसर्या वर्षी 50 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. गुणवत्ता आणि आर्थिक गरज या दोन्ही निकषांवर विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील तसेच कुटुंबातून पहिल्यांदाच उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी NSE सोशल स्टॉक एक्सचेंजवरील फ्युएलच्या दुसर्या इश्यूसोबत या संस्थेचा औपचारिक शुभारंभ होणार आहे.
ऑलकार्गो समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. भारताच्या आर्थिक विकासात लॉजिस्टिक्स क्षेत्राचे मोठे योगदान असून, या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज वाढत आहे. मात्र, ग्रामीण आणि वंचित भागातील तरुणांना दर्जेदार शिक्षण व आवश्यक कौशल्ये मिळण्यात अडचणी येतात. ही शैक्षणिक दरी दूर करून उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा ऑलकार्गो स्कूल ऑफ लॉजिस्टिक्सचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य संधी मिळाल्यास तरुणांचे आयुष्य बदलू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, फ्युएलचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. केतन देशपांडे यांनी या सहकार्याचे स्वागत केले आहे. ऑलकार्गो समूहाचे आर्थिक योगदान हे केवळ मदत नसून विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर दाखवलेला विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योगसंस्थांच्या सहकार्याने प्रकल्पाधारित शिक्षण, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि शिकाऊ उमेदवारीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे कुटुंबातून पहिल्यांदाच उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळण्यास मदत होणार आहे.