…तर मराठा समाजातील तरूण वंचित राहतील; मराठा आरक्षण अभ्यासक कोंढरे असं का म्हणाले?
Maratha Reservation Expert Rajendra Kodhare : सरकारकडून केवळ 'आम्ही सकारात्मक आहोत' एवढंच सांगितलं जात असल्याने संभ्रम अधिक वाढत आहे.
Maratha Reservation Expert Rajendra Kodhare : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गेल्या 3 वर्षांपासून मांडल्या जाणाऱ्या आकडेवारीमुळे मराठा आणि ओबीसी समाजात संघर्षाची धार वाढली आहे, अशी भूमिका मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे यांनी मांडली. (Reservation) दोन्ही समाजांकडून केल्या जाणाऱ्या मागण्या संविधानिक आणि व्यवहार्य किती आहेत, याचा विचार करून सरकारने प्रत्यक्षात जे देणे शक्य आहे ते स्पष्टपणे सांगितले पाहिजे. मात्र, सरकारकडून केवळ ‘आम्ही सकारात्मक आहोत’ एवढेच सांगितले जात असल्याने संभ्रम अधिक वाढत असल्याचे कोंढरे यांनी म्हटले.
मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीकडून एसईबीसी आरक्षणाच्या प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. एसईबीसी आरक्षणाचा खटला न्यायालयात सुरू असल्याने मराठा समाजात संभ्रमाचे वातावरण आहे आणि त्यातूनच ओबीसी आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलकांनी मांडलेल्या मागण्यांवर सरकारने एकत्रितपणे चर्चा करण्यासाठी एकाच व्यासपीठावर बैठक घेणे आवश्यक आहे, मात्र आतापर्यंत अशी चर्चा झालेली नसल्याने तोडगा निघत नसल्याचे कोंढरे यांनी स्पष्ट केलं.
Video : संयमाने घ्या म्हणजे धमकी देता काय?, तुमच्या नरडीचा घोट घेऊ, जरांगे पाटील आक्रमक
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांमध्ये वारंवार बदल होत असल्याने आंदोलनाचा कालावधी वाढल्याचेही कोंढरे यांनी नमूद केले. एका मागणीवर सरकारकडून विचार सुरू असतानाच नवीन मागणी पुढे येते आणि त्यामुळे चर्चेची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू होते, असे त्यांनी सांगितले. गॅझेटियरमधील कुणबी नोंदींचा मुद्दाही अत्यंत गुंतागुंतीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील प्रकरणानंतर विविध नोंदींमध्ये केवळ मराठाच नव्हे, तर 19 जातींनी क्षत्रियत्वाचा दावा करत मराठा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वच मराठा समाज कुणबी म्हणून नोंदवला गेला तर महाराष्ट्राच्या जातव्यवस्थेतून ‘मराठा’ हे नावच बाजूला पडण्याची शक्यता असल्याचा इशाराही कोंढरे यांनी दिला. नोकरीतील बढती आणि शैक्षणिक प्रवेशातील गुणवत्तेच्या यादीवर याचा काय परिणाम होईल, याबाबत तज्ज्ञांनी पुढे येऊन भूमिका मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच मराठे कुणबी झाले तर 19 टक्के आरक्षणातील गुणवत्तेच्या यादीत मोठी स्पर्धा निर्माण होऊन वंचित मराठा मागे पडू शकतो. त्यामुळे मराठा समाजासमोर एसईबीसी आणि कुणबी अशा दोन संधी आहेत. ‘दोन्ही एकत्र करून एकाच बसमध्ये बसण्याचा प्रयत्न केला, तर बहुतांश लोक बसस्थानकावरच राहतील’, असे कोंढरे यांनी स्पष्ट केले.