तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपाआधी सरकारचा मोठा निर्णय, रविवारीही बँका राहणार खुल्या

रविवार, 27 सप्टेंबर 2026 रोजी देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका नियमितपणे सुरू राहणार आहेत.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 23T163718.739

Banks to remain open on Sunday as well : देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रस्तावित तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रविवार, 27 सप्टेंबर 2026 रोजी देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका नियमितपणे सुरू राहणार आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अर्थात UFBU ने 28 ते 30 सप्टेंबर या तीन दिवसांसाठी देशव्यापी बँक संपाची हाक दिली आहे. त्याआधी 26 सप्टेंबरला शनिवार आणि 27 सप्टेंबरला रविवार असल्याने सलग अनेक दिवस बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता होती.

विशेषतः शाखांमधून होणारे व्यवहार, रोख रकमेची उपलब्धता आणि इतर महत्त्वाच्या बँकिंग कामांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना अत्यावश्यक व्यवहार पूर्ण करता यावेत, यासाठीच रविवार असूनही बँका सुरू ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाला भारतीय रिझर्व्ह बँकेनेही मंजुरी दिली आहे.

भाजप लागला 2029’च्या तयारीला! पक्षसंघटनेत खांदेपालट, देशभरात प्रभारींची नियुक्ती, वाचा यादी

त्यामुळे 27 सप्टेंबर रोजी बँकांच्या शाखा, कार्यालये, एटीएम-लिंक शाखा आणि करन्सी चेस्ट पूर्णपणे कार्यरत राहणार आहेत. बँक ग्राहकांचे हित आणि त्यांची सुविधा ही सरकारची प्राथमिकता असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि नियमितपणे शाखांमधून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

दरम्यान, सरकार आणि बँक व्यवस्थापनांनी संबंधित कर्मचारी संघटनांना प्रस्तावित संप पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक बँकिंग सेवा सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात येत आहेत. संपामुळे सामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊ नये, यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

ज्ञानेश कुमारांना अटक करा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

त्यामुळे 27 सप्टेंबरला रविवार असला तरी सार्वजनिक क्षेत्रातील आणि प्रादेशिक ग्रामीण बँका बंद राहणार नाहीत. ग्राहकांना या दिवशी बँकेच्या शाखेत जाऊन आपली महत्त्वाची कामे पूर्ण करता येणार आहेत. मात्र 28, 29 आणि 30 सप्टेंबरला प्रस्तावित संप झाल्यास बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक बँकिंग व्यवहार असलेल्या ग्राहकांसाठी 27 सप्टेंबरचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

follow us