पाच लाख घेऊन लग्नाचा बनाव, माप ओलांडताच नवरी पसार! तरुण शेतकऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा

लग्नाचे स्वप्न दाखवून तरुण शेतकऱ्याकडून 5 लाख रुपये उकळले आणि लग्नाचा सोपस्कार पार पडताच नववधू काही तासांतच पसार झाली.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 29T160329.777

Marriage Fraud Case : लग्नाच्या आशेने पाच लाख रुपये खर्च केलेल्या एका तरुण शेतकऱ्याला मोठा धक्का बसला आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले आणि विवाहाचा सोपस्कार पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांत नववधू घरातून पसार झाली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात सुनील विठोबा खेमणार (वय 30, रा. संगमनेर), कोमल राजू पवार, सचिन जाधव (रा. वानखेडेनगर) आणि कांता राहाणे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबड तालुक्यातील या तरुणाची एप्रिल 2026 मध्ये एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत सुनील खेमणारशी भेट झाली होती. खेमणारने लग्नासाठी मुलगी असल्याचे सांगत त्याला 28 एप्रिल रोजी राहुरी येथे बोलावले. यावेळी लग्न जुळवून देण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा राहुरी येथे बोलावून वेगळीच मुलगी दाखवण्यात आली. लग्नाच्या तयारीसाठी कपडे, दागिने आणि अन्य खर्चांची कारणे सांगून तरुणाकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेतल्याचा आरोप आहे.

बीडमध्ये प्राध्यापकाचा संतापजनक प्रकार! विद्यार्थिनीचा विनयभंग, नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप

यानंतर 16 एप्रिल रोजी सायंकाळी तरुणाला वानखेडेनगर येथील सचिन जाधवच्या घरी नेण्यात आले. तेथे कोमल राजू पवार (रा. कुंभेफळ) हिच्याशी त्याची ओळख करून देण्यात आली. मात्र, कोणतेही धार्मिक विधी किंवा कायदेशीर विवाह नोंदणी न करता केवळ एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न झाल्याचे भासवण्यात आले. त्यानंतर कोमलला तरुणासोबत बारसवाडा येथे पाठवण्यात आले. मात्र, सासरी पोहोचल्यानंतर अवघ्या काही तासांतच ती तेथून पसार झाली.

नववधू अचानक गायब झाल्याने तरुणाने सुनील खेमणारकडे विचारणा केली. त्यावर काही दिवस थांबा, दुसरी मुलगी पाहून देतो, असे उत्तर देत त्याने फोन कट केला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित चौघांविरोधात गुन्हा नोंदवला असून, संगमनेर परिसरातील एका गावातून सुनील खेमणारला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

follow us