राजकीय लोकांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला; पडीक जमिन मुद्द्यावर मंत्री बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण

Chandrashekhar Bawankule on Barren Land : तीन वर्षे शेती न केलेली जमीन सरकार ताब्यात घेणार याबाबत बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 23T172727.521

Chandrashekhar Bawankule on Barren Land : पडीक शेतजमिनी सरकारजमा करण्याच्या (Bjp) विधानावरून निर्माण झालेल्या संभ्रमावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. तीन वर्षांपर्यंत शेती न केलेली जमीन सरकार ताब्यात घेणार असल्याच्या त्यांच्या विधानामुळे राज्यातील शेतकरी आणि जमीन खरेदीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेणार नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, या निर्णयाचा संबंध मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून त्या पडीत ठेवणाऱ्या व्यक्तींशी आहे.

बावनकुळे यांनी सांगितले की, काही लोकांनी फार्महाऊस किंवा भविष्यातील गुंतवणुकीच्या उद्देशाने 50 ते 100 एकरपर्यंत जमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र, अशा जमिनी अनेक वर्षांपासून शेतीविना पडून आहेत. त्यामुळे जमिनीचा शेतीसाठी उपयोग होत नसून देशाचेही नुकसान होत आहे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून लँड बँक तयार करणाऱ्यांच्या जमिनींबाबत सरकारचा विचार सुरू आहे. या जमिनी छोट्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तीन वर्षे शेतजमीन पडीक ठेवल्यास सरकारच्या ताब्यात जाणार? महसूलमंत्री बावनकुळेंचे महत्त्वाचे विधान!

दरम्यान, आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा आरोपही महसूलमंत्र्यांनी केला आहे. काही राजकीय नेत्यांनी जाणीवपूर्वक या विधानाचा विपर्यास करून सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण केल्याचे ते म्हणाले. तीन वर्षे जमीन कसली नाही तर ती सरकारजमा केली जाईल, हा नियम सामान्य शेतकऱ्यांसाठी नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी या विधानामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांच्या स्पष्टीकरणातून स्पष्ट झाले आहे.

नागपूर येथे बोलताना बावनकुळे यांनी पडीक जमिनींच्या प्रश्नावर भूमिका मांडली होती. व्यापारी आणि व्यावसायिक भविष्यातील आर्थिक फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी खरेदी करतात आणि त्यांचा शेतीसाठी वापर न करता त्या वर्षानुवर्षे पडीत ठेवतात, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. नैसर्गिक कारणांमुळे, पावसाअभावी किंवा दुष्काळामुळे जमीन पडीक राहणे वेगळे; मात्र पाणी उपलब्ध असूनही शेती न करणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ जमीन पडीत ठेवण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. आता मात्र हा विषय सर्वसामान्य शेतकऱ्यांशी संबंधित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

follow us