संकटात तुम्ही एकटे नाही, रडणाऱ्या शेतकऱ्याला फडणवीसांची मिठी, सरसकट मदतीची ग्वाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा आणि निलंगा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Chief Minister’s assurance to declare a drought : लातूर जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. औसा आणि निलंगा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांना पाहताच एका शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. तो ढसाढसा रडत मुख्यमंत्र्यांसमोर आला आणि दुष्काळामुळे ओढवलेली परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. शेतकऱ्याची व्यथा ऐकल्यानंतर फडणवीस यांनी त्याला मिठीत घेत धीर दिला.
लातूर जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पीक पूर्णपणे हातातून गेल्याची परिस्थिती आहे. हिरव्या दिसणाऱ्या सोयाबीनच्या शेंगांमध्येही दाणे नसल्याचे पाहणीदरम्यान समोर आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नदी, नाले आणि विहिरी कोरड्या पडल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या दोन दिवसांत दुष्काळासंदर्भातील जीआर काढण्यात येणार असल्याचे सांगितले. दुष्काळामुळे सरसकट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतही सरसकट देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंचनाम्याची कायदेशीर प्रक्रिया केली जात असली तरी मदत देताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षेतील पदसंख्येत वाढ होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले निर्देश
संकट मोठं आहे. मात्र शेतकऱ्यांनी काळजी करू नये. सरकार तुमच्या पाठीशी आहे. कोणतीही मदत कमी पडू दिली जाणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिला. लातूर जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून 1972 नंतर इतका मोठा दुष्काळ या भागात पाहायला मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पाणी, चारा आणि अन्नधान्याचीही मदत
दुष्काळाचा फटका केवळ खरीप पिकांपुरता मर्यादित राहिलेला नसून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबत पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जातील. रब्बी हंगामात पिके घेणे शक्य व्हावे यासाठीही आवश्यक मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळाची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाच्या कारभारावर काँग्रेसचा गंभीर आरोप, ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी
खरोसा परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही
औसा मतदारसंघातील खरोसा शिवारातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. खरोसा आणि परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्नही यावेळी त्यांच्यासमोर मांडण्यात आला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.
दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाच्या कामांना गती देणे, स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे आणि शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक मदत पोहोचवणे यावर सरकारचा भर राहणार आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकरी एकटे नसून राज्य सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी दौऱ्यादरम्यान दिला.