दलित पँथर, भाजपशी युती अन् विद्यापीठ नामांतर; रामदास आठवले स्पष्टच बोलले
Ramdas Athawaleरामदास आठवले यांनी दलित पँथर, भाजप युती आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतरावर भाष्य केलं.
Ramdas Athawale on Dalit Panthers, BJP Alliance & University Renaming : केंद्रीय राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं. दलित चळवळीपासून ते मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनापर्यंतचा प्रवास, शरद पवारांसोबतचा राजकीय काळ, भाजपसोबत जाण्याचा निर्णय, पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत विरोधकांकडून होणारी टीका आणि संसदेतल्या आपल्या भाषणशैलीवर होणारी खिल्ली अशा अनेक विषयांवर आठवले त्यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.
मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मागणी
दलित चळवळीतील सुरुवातीच्या काळाच्या आठवणी सांगताना रामदास आठवले यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, त्या काळात आपण सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत होतो. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी आम्हीच केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावं, असं मत होतं. त्यामुळे त्या विद्यापीठाला त्यांचंच नाव देण्यात यावं, अशी आमची भूमिका होती. मात्र विद्यापीठाच्या नामांतराला त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता, असं आठवले यांनी सांगितलं.
शरद पवारांनी नामांतराचा प्रस्ताव मांडला
त्या काळात शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर झाला. मात्र ठराव मंजूर झाल्यानंतर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर दंगली आणि जाळपोळ झाली.
लाखो रुग्णांसाठी धोक्याची घंटा? WHO च्या संस्थेने 3 औषधांबाबत दिला मोठा इशारा
नांदेडमध्ये जनार्दन मेवाडे आणि पोचीराम कांबळे यांची हत्या झाली. मराठवाड्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. या संपूर्ण आंदोलनामुळे समाजाचं मोठं नुकसान झालं, अशी आठवण आठवले यांनी सांगितली.
‘नामांतरासाठी मंत्रीपद सोडायला तयार होतो’
पुढे शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात आपल्याला समाजकल्याण खात्याची जबाबदारी मिळाली, असं आठवले यांनी सांगितलं.
1990 च्या काळातील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, त्या वेळी समाजातील विविध गट एकत्र आले होते. मात्र या एकत्रीकरणामुळे आपल्याला भारतीय दलित पँथर चळवळ बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. समाजाच्या ऐक्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
त्या काळात सर्व गटांनी एकत्रितपणे शरद पवार यांच्याशी चर्चा केली असती आणि ‘आम्ही तुमच्यासोबत येण्यास तयार आहोत, मात्र आम्हाला 25 ते 30 टक्के सत्ता मिळाली पाहिजे किंवा आमच्या काही मागण्या मान्य कराव्या लागतील’, अशी भूमिका मांडली असती, तर पवारांनी त्या मागण्या मान्य केल्या असत्या, असं आठवले म्हणाले.
‘नामांतर झालं नाही तर मंत्रीपद सोडेन’
1995 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. 26 जानेवारी 1995 पूर्वी विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिलं नाही, तर आपण शरद पवारांसोबत सत्तेत राहणार नाही आणि मंत्रीपद सोडण्यासही तयार आहोत, असं आपण पवारांना सांगितल्याचं आठवले यांनी सांगितलं.
शिक्षण व्यवस्था नोकरी-उद्योजकतेसाठी अपुरी; निर्मला सीतारामन यांची स्पष्ट कबुली
मात्र शरद पवारांनी त्यांना तसं करण्यापासून रोखलं. या मुद्द्यावरून मराठवाड्यात पुन्हा दंगली होऊ नयेत, अशी पवारांची भूमिका होती. त्यानंतर झालेल्या चर्चेत 14 जानेवारी 1994 रोजी नामांतराचा निर्णय घेण्याचं निश्चित झालं आणि अखेर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं, असं आठवले यांनी सांगितलं.
‘मोदींच्या विकासाच्या अजेंड्यामुळे भाजपसोबत गेलो’
भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावरही रामदास आठवले यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा अजेंडा लक्षात घेऊन आपण त्यांच्यासोबत गेल्याचं त्यांनी सांगितलं.
विरोधकांकडून नरेंद्र मोदी हुकूमशहासारखे वागतात, असा आरोप केला जातो. यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, हा राहुल गांधी आणि काँग्रेसचा मतप्रवाह आहे. मोदींनी पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडला, याचा काँग्रेसला राग असल्याचा दावाही त्यांनी केला.
नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार काम करत असल्याचंही आठवले म्हणाले.
‘कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी संविधान बदलू शकत नाही’
लोकसभा निवडणुकीच्या काळात विरोधकांनी संविधान बदललं जाणार असल्याचा आरोप करत मोठा प्रचार केला होता. या आरोपावरही आठवले यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली.
समाज कल्याणच्या पैशांबाबत कायदा करा; लाडक्या बहिणीसाठी वळवल्याचा आरोप करत आठवलेंची मागणी
“कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी संविधान बदलू शकत नाही,” असं रामदास आठवले यांनी ठामपणे सांगितलं. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी एनडीए सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलं, त्यामुळे विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा राग असल्याचा दावा त्यांनी केला.
संसदेत भाषणाची खिल्ली उडवली जाते, पण…
रामदास आठवले यांच्या संसदेतल्या भाषणांची आणि विशेषतः त्यांच्या कवितांची अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा होते. आपल्या भाषणांची संसदेत खिल्ली उडवली जात असली, तरी अनेक खासदार आणि इतर लोक आपली भाषणं आणि कविता आवडत असल्याचं सांगतात, असं आठवले म्हणाले.
संसदेत जेवढा वेळ भाषण करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मिळतो, त्या वेळेत आपण आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘मी पुस्तकातला कवी नाही’
आपल्या कवितांबद्दल बोलताना आठवले यांनी स्वतःची शैलीही स्पष्ट केली. आपण पुस्तकातला कवी नसून सर्वसामान्यांना समजतील अशा पद्धतीने यमक जुळवून कविता करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुस्तकातील अनेक कविता सामान्य लोकांना सहज समजत नाहीत, मात्र त्यांच्या कविता सर्वसामान्यांना समजतात आणि त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो, असं आठवले म्हणाले.
विशेष म्हणजे, आपल्या कविता ऐकून विरोधकही अनेकदा खळखळून हसतात, असा किस्साही त्यांनी सांगितला. त्यामुळे संसदेत आपल्या भाषणांची खिल्ली उडवली जात असली तरी त्यातूनच आपली वेगळी शैली आणि जनतेशी जोडलेपण निर्माण होत असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतं.