डिलिमिटेशनमुळं लोकशाहीला मोठा धोका, राज्यसभेचं महत्त्व संपणार, घटना तज्ज्ञ उल्हास बापट काय म्हणाले?
लोकसभेच्या जागा 850 होणार, डिलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्था आणि राज्यसभेच्या महत्त्वावर परिणाम होण्याची उल्हास बापट यांची भीती.
Delimitation Bill : केंद्र सरकारने डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत मांडण्याची तयारी पूर्ण केली असून, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या डीएमकेने पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे संसदेत एनडीएचे राजकीय बळ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विधेयकातील तरतुदींनुसार लोकसभेतील खासदारांची संख्या 850 पर्यंत वाढवली जाणार असून, देशभरातील लोकसभा मतदारसंघांच्या सीमा नव्याने निश्चित केल्या जाणार आहेत. याशिवाय महिलांना संसदेत अधिक प्रतिनिधित्व मिळण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे.
मात्र, या संपूर्ण प्रक्रियेवर घटनात्मक आणि राजकीय आक्षेप घेतले जात आहेत. विशेषतः लोकसभेच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढवताना राज्यसभेची सदस्यसंख्या मात्र कायम राहणार असल्याने संसदेतील दोन्ही सभागृहांमधील संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. याच मुद्द्यावर घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, या विधेयकाचा परिणाम केवळ मतदारसंघांच्या पुनर्रचनेपुरता मर्यादित राहणार नसून, भारतीय संघराज्य व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांवरही होऊ शकतो.
उल्हास बापट यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यसंख्येतील संभाव्य तफावतीकडे लक्ष वेधले आहे. सध्या राज्यसभेत 250 सदस्य असून, लोकसभेची संख्या 850 पर्यंत गेल्यास दोन्ही सभागृहांमधील प्रतिनिधित्वाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बदलेल. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्रपणे दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असते. मात्र, सामान्य विधेयकावर दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद निर्माण झाल्यास कलम 108 नुसार संयुक्त अधिवेशन बोलावता येते. अशा वेळी दोन्ही सभागृहांचे सदस्य एकत्र मतदान करतात आणि लोकसभेतील सदस्यसंख्या अधिक असल्याने तिचे मत वरचढ ठरण्याची शक्यता असते. परिणामी राज्यसभेचे महत्त्व कमी होण्याचा धोका असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.
या विधेयकाच्या घटनात्मक वैधतेवरही उल्हास बापट यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विधेयक घटनाबाह्य असल्याचा दावा करत भविष्यात त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेला लागणारा विलंब हा आणखी एक गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाकडून एखाद्या प्रकरणाचा निकाल येण्यासाठी 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत निवडणुकीच्या अनेक फेऱ्या पार पडलेल्या असू शकतात. त्यामुळे घटनात्मक वादाचा अंतिम निकाल येण्यापूर्वीच प्रत्यक्ष राजकीय परिस्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांची रचना वेगवेगळ्या उद्देशाने करण्यात आली आहे. लोकसभेत देशातील जनतेचे, तर राज्यसभेत विविध राज्यांचे प्रतिनिधित्व केले जाते. त्यामुळे लोकसभेतील जागा वाढवताना राज्यांच्या प्रतिनिधित्वाचे महत्त्व आणि संघराज्य व्यवस्थेतील संतुलन जपणे आवश्यक आहे. परिसीमनाच्या प्रक्रियेत लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना करताना काही राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढू शकते, तर काही राज्यांचे तुलनात्मक महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यांमधील प्रतिनिधित्वाच्या समतोलावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती बापट यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, डिलिमिटेशन म्हणजेच परिसीमन ही प्रक्रिया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदारसंघांच्या सीमा नव्याने निश्चित करण्याशी संबंधित आहे. एखाद्या भागातील लोकसंख्या वाढली किंवा कमी झाली, तर त्या प्रमाणात मतदारसंघांची रचना बदलण्याची गरज निर्माण होते. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक भागाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश असतो. याच प्रक्रियेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांचे प्रमाणही निश्चित केले जाते. मात्र, लोकसंख्येच्या आधारे होणाऱ्या या पुनर्रचनेत राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व, राज्यसभेचे स्थान आणि संघराज्य व्यवस्थेचे संतुलन यांचा विचार झाला नाही, तर भारतीय लोकशाहीसमोर मोठे घटनात्मक आव्हान उभे राहू शकते, असा इशारा घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिला आहे.