मला शिव्या द्या, महाराष्ट्राला बदनाम करू नका, मिसिंग लिंकवरून विधानसभेत फडणवीसांचा जोरदार पलटवार

मुसळधार पावसामुळे आणि त्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर देत जोरदार पलटवार केला.

  • Written By: Published:
Untitled Design 18

Fadnavis’s strong counter-attack in the Legislative Assembly : पावसाळी अधिवेशनात मुंबई-पुणे मिसिंग लिंक, मुसळधार पावसामुळे झालेली दरड आणि त्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर देत जोरदार पलटवार केला. अलीकडील मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळून सुमारे 18 तास वाहतूक बंद राहिली होती. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मात्र या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी महायुती सरकारच्या निर्णयक्षमतेचे समर्थन करत मिसिंग लिंक हा अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, मिसिंग लिंकचा विषय मुद्दाम चुकीच्या पद्धतीने मांडला गेला. महायुती सरकारने धाडस दाखवले म्हणूनच हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला. त्यांनी मधू दंडवते यांचा उल्लेख करत कोकण रेल्वेचे उदाहरण दिले. कोकण रेल्वेच्या उभारणीवेळीही दरडी कोसळण्याचा धोका सांगून विरोध झाला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षांत दरडी कोसळल्या, त्यातून अनुभव घेत उपाययोजना करण्यात आल्या आणि आज ती रेल्वे यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भीतीपोटी मोठे प्रकल्प थांबवले असते तर विकासच झाला नसता, असेही ते म्हणाले.

फडणवीस यांनी दावा केला की, पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार झाला होता. मात्र त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी विविध कारणे देत प्रकल्पाची फाईल बंद केली. त्याउलट महायुती सरकारने तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीपणे पूर्ण करून दाखवला. या प्रकल्पातून जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक तसेच भारतातील सर्वात उंच केबल-स्टे पुल उभारण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

सेन्सेक्स 1700, निफ्टी 500 अंकानी कोसळला; ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी संपवल्याच्या घोषणेने शेअर बाजार गडगडला

दरड कोसळण्याच्या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, वरून आलेली दरड पाण्याच्या कमानीवर आदळल्यामुळे ती तुटली आणि खाली माती-दगडांचा ढिगारा साचला. मात्र बोगद्यातील आपत्कालीन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झाली आणि काही मिनिटांत मदतकार्य सुरू करण्यात आले. या आधुनिक सुविधांमुळे मोठी दुर्घटना टळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, काही जण तथ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ खोटा प्रचार करत आहेत. फडणवीसांना शिव्या द्या, मला त्याची सवय आहे. मी शिव्या-प्रूफ आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, असे ते म्हणाले. स्वतःवर टीका स्वीकारू, मात्र राज्याच्या प्रतिमेशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मिसिंग लिंकचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. विकासकामांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार राजकीय संघर्ष रंगला असून, येत्या काळातही हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

follow us