कोल्हापूरच्या सुपुत्राची बेंगळुरूच्या गुंडांना थेट वॉर्निंग! ‘अपुन के एरिया में लफड़ा नहीं’; IPS हेमंत निंबाळकरांचा सज्जड दम
IPS Hemant Nimbalkar warns Bengaluru gangsters: हेमंत निंबाळकरांकडे बेंगळुरूच्या वाहतूक आयुक्तपदासह अँटी राउडी स्कॉडची जबाबदारी.
IPS Hemant Nimbalkar warns Bengaluru gangsters: सर्वसामान्यांना त्रास देणारे, महिलांची छेड काढणारे आणि शहरात दहशत निर्माण करून पैसे कमावणाऱ्या गुंडांची आता खैर नाही! कोल्हापूरचे (Kolhapur) सुपुत्र आणि कर्नाटक (Karnatak) केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्याकडे बेंगळुरू शहराच्या वाहतूक आयुक्तपदासोबतच अँटी राउडी स्कॉडची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. ‘अपुन के एरिया में लफड़ा नहीं’, अशा शब्दांत त्यांनी गुंडांना सज्जड दम भरला.
ठाकरेंनी भाजपला शब्दावरून घेरलं होतं; आता अकाली दलाने शाहंकडून वदवून घेतलं
निंबाळकर यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की, चांगलं आयुष्य जगायचं असेल आणि सुधारायचं असेल तर माझ्याकडे या. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेन. मात्र, सर्वसामान्य नागरिक, महिला आणि कष्टकरी लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर माझ्याशी गाठ आहे. शहरात दहशत पसरवून पैसे कमावण्याचे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
गुन्हा करण्याआधी शंभर वेळा विचार करा!
बेंगळुरूमध्ये कुणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस गप्प बसणार नाहीत, असं निंबाळकर यांनी स्पष्ट केलं. सरकारने पोलिसांना लाठी-काठीसोबत बंदूकही दिली आहे. ती केवळ दाखवण्यासाठी नाही, तर गरज पडल्यास कायद्यानुसार तिचा वापर केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. रस्त्यावरून जाणाऱ्या महिला-मुलींना, सामान्य नागरिकांना किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या गरीब लोकांना कुणी त्रास दिला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी बजावलं.
बेंगळुरूमध्ये पहिल्यांदाच अँटी राउडी स्कॉड
बेंगळुरूमधील वाढती गुन्हेगारी आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने अँटी राउडी स्कॉड ही विशेष यंत्रणा सुरू केली आहे. टोळ्यांशी संबंधित गुन्हे, वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्ती आणि शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर या यंत्रणेमार्फत लक्ष ठेवलं जाणार आहे. या महत्त्वाच्या यंत्रणेची जबाबदारी हेमंत निंबाळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कामाकडे महाराष्ट्रासह कर्नाटकातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
बेळगावमधील कारकीर्द गाजली
हेमंत निंबाळकर हे 1998 बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांचा जन्म कोल्हापुरात झाला आहे. जवळपास 28 वर्षांच्या पोलीस सेवेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक असताना त्यांनी मराठी-कन्नड आणि हिंदू-मुस्लिम वादाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना केला. 2007 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कुख्यात गुंड प्रवीण शिंत्रे याचं एन्काउंटर करण्यात आलं होतं.
रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देणार?, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
यानंतर त्यांनी दहशतवादविरोधी पथक (ATS), राज्य गुप्तचर विभाग आणि बेंगळुरू पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. आयसीसशी संबंधित भारतातील हस्तक मेंहदी मसरुर विश्वास याला अटक करण्याच्या कारवाईतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. कर्नाटकातील नक्षलवादविरोधी मोहिमेतही त्यांनी काम केलं आहे.
केबल टाकण्यापासून आयपीएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास
हेमंत निंबाळकर यांचा प्रवासही तितकाच संघर्षाचा आहे. कोल्हापुरातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या निंबाळकर यांनी सुरुवातीच्या काळात केबल टाकण्याचं कामही केलं. परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या पोलीस सेवेतील कामगिरीसाठी 2014 मध्ये त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरवण्यात आलं. त्याशिवाय मुख्यमंत्री विशेष पदकानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
रितेश-जिनिलियाचा रोमँटिक फोटो व्हायरल! राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याशी नेटकऱ्यांनी जोडला संबंध
आता बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरातील वाहतूक आणि गुन्हेगारी नियंत्रणाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. पदभार स्वीकारताच गुंडांना दिलेल्या इशाऱ्यामुळे निंबाळकर यांची नियुक्ती चर्चेत आली आहे. त्यामुळे आगामी काळात ते शहरातील गुन्हेगारीला कसा आळा घालतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल.