परळीच्या सुपुत्राचा त्रिपुरात दबदबा; किरण गित्ते यांच्याकडे मुख्यमंत्री सचिवालयासह महत्त्वाची खाती

भारतीय प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या किरण गित्ते यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (57)

Kiran Gitte entrusted with the responsibility of the Tripura Secretariat : आयएएस किरण गित्ते यांची त्रिपुरा राज्याच्या मुख्यमंत्री सचिवालयातील अत्यंत महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. परळीसारख्या ग्रामीण भागातून शिक्षण आणि जिद्दीच्या बळावर भारतीय प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या किरण गित्ते यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे.

त्रिपुरा राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार किरण गित्ते यांच्याकडे आता थेट मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्य कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव म्हणून ते राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणार आहेत. मुख्यमंत्री आणि विविध शासकीय विभागांमधील समन्वय साधने, महत्वाच्या विकासकामांचा आढावा घेणे, प्रशासकीय कामकाजाला गती देणे आणि शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे या महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर असणार आहेत.

याशिवाय त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, माहिती व संस्कृती विभाग, शिशासन विभाग तसेच उद्योग व वाणिज्य विभाग या राज्याच्या अत्यंत महत्वाच्या खात्यांचे सचिवपद देखील सोपवण्यात आले आहे. ही सर्व खाती राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्वाची मानली जातात. सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यातील रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधा विकासाशी संबंधित असून, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी महत्वाचा आहे. उद्योग व वाणिज्य विभाग राज्यातील गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आयोडयोगीं विकासाला चालना देण्याचे काम करतो, तर माहिती व संस्कृती विभाग शासनाच्या जनसंपर्क आणि सांस्कृतिक उपक्रमांशी निगडित आहे.

विशेष म्हणजे, किरण गित्ते यांच्याकडे त्रिपुरा इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या महत्वाकांक्षी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपवण्यात आला आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक नियोजन, नवकल्पना, प्रशासकीय सुधारणा आणि दीर्घकालीन विकास आराखडे तयार करण्यामध्ये या संस्थेची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्या प्रशासकीय क्षमतेवरही राज्य शासनाच्या विश्वासाचे द्योतक मानला जात आहे.

भारतीय बॅडमिंटनसाठी अभिमानाचा क्षण; पी. व्ही. सिंधू जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय, सुपर 750 किताबावरही कोरले नाव

एकाच वेळी मुख्यमंत्री सचिवालयासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, अयोग्य आणि सुशासन यांसारख्या महत्वाच्या विभागांची जबाबदारी सोपवण्यात आल्याने त्रिपुरा प्रशासनातील त्यांचे स्थान अधिक प्रभावी झाले आहे. राज्य शासनाच्या महत्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका अधिक निर्णायक ठरणार असल्याचे प्रशासनातील जाणकारांचं मत आहे.

परळी वैजनाथच्या मातीतून घडलेल्या किरण गित्ते यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर भारतीय प्रशासकीय सेवेत यश मिळवले. विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी कार्यक्षम आणि परिणामकारक अधिकारी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामकाजातील पारदर्शकता, निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांना प्रशासनात विशेष मान्यता मिळाली आहे.

त्रिपूराच्या राज्यपालांच्या सहीने हा अधिकृत आदेश जारी झाल्यानंतर परळी वैजनाथसह संपूर्ण बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी किरण गित्ते यांच्या या नियुक्तीचे स्वागत केले असून, ही नियुक्ती परळी आणि बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

ग्रामीण भागातील युवकांसाठी किरण गित्ते यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरत असून, कठोर परिश्रम, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे कोणतीही उंची गाठता येते, याचे ते जिवंत उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यांच्या या यशामुळे परळी वैजनाथ आणि बीड जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

follow us