अजितदादांच्या निधनानंतर तटकरेंचा ‘तो’ गुप्त डाव; शिवसेना आमदाराचा दाव्याने राजकारणात खळबळ

Mahendra Thorve Allegations : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असताना मोठा दावा समोर.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 07T152104.157

Mahendra Thorve Allegations : अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्याचा खळबळजनक दावा शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निधनानंतर काही आमदारांना गुप्त फोन केले होते. त्यांना स्वतः उपमुख्यमंत्री व्हायचे होते, अर्थ खाते स्वतःकडे घ्यायचे होते आणि राष्ट्रवादी पक्षावर ताबा मिळवायचा होता, असा गंभीर आरोप थोरवे यांनी केला आहे.

थोरवे यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या होत्या, याबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, महेंद्र थोरवे यांच्या आरोपांवर सुनील तटकरे काय भूमिका मांडतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अजित पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत 13 बैठका झाल्या होत्या, मग या बैठकांमध्ये अजित पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून सुनील तटकरे का उपस्थित नव्हते, असा सवाल महेंद्र थोरवे यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांनी आपल्याला पूर्ण कल्पना दिली होती, असे सुनील तटकरे सांगत आहेत, मात्र ते खोटे बोलत असल्याचा आरोपही थोरवे यांनी केला. विलीनीकरणाबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगणाऱ्या तटकरेंनी आता भूमिका बदलल्याचेही ते म्हणाले.

सुनील तटकरे हे खोटे आणि कपटी माणूस असल्याची टीका करत थोरवे यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना फोन केले होते. सर्व आमदारांना आपल्या बाजूने वळवून उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खाते मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या खेळीमुळे तटकरेंचा हा डाव उलटल्याचा गौप्यस्फोट थोरवे यांनी केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत खासदार सुनील तटकरे यांनीही महत्त्वाचे विधान केले होते. अजित पवार हयात असते तर आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असते, असे ते म्हणाले होते. तसेच दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तटकरेंच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून नव्या चर्चांना सुरुवात झाली.

मात्र, त्यानंतर तटकरे यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. विलीनीकरणाचा मुद्दा आता संपला असून सध्या याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विलीनीकरणावरून थोरवे यांचे आरोप आणि तटकरेंची बदलती भूमिका यामुळे राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

follow us