माजलगाव अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट! दाम्पत्याला उडवणारा मुलगा कोण?, पोलिसांनी दुसऱ्याच मुलाच्या वडिलांना ठोकल्या बेड्या

Majalgaon Accident Case : माजलगावमधील गायकवाड दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. पोलिसांची मोठी कारवाई केली.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 24T142923.903

Majalgaon Accident Case : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील (Beed) गायकवाड दाम्पत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भीषण अपघात प्रकरणात पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. अपघातावेळी कार चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या पालकांविरोधातही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संभाजी नाईकनवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून माजलगाव शहर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना आज माजलगाव न्यायालयात हजर केले जाणार असून अल्पवयीन मुलाला बीड येथील बाल न्यायमंडळासमोर उपस्थित केले जाणार आहे.

या प्रकरणातील कारवाईला वेग येण्यामागे अपघाताचा व्हिडिओ आणि अल्पवयीन मुलाच्या वाहन चालवण्याचा समोर आलेला पुरावा महत्त्वाचा ठरला आहे. संबंधित मुलगा चारचाकी चालवत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पालकांची जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यानुसार संभाजी नाईकनवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन दिल्याप्रकरणी पालकांविरोधात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

माजलगावच्या गढी रोडवर 20 नोव्हेंबर रोजी दुपारी हा भीषण अपघात घडला होता. गायकवाड दाम्पत्य दुचाकीवरून प्रवास करत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भयानक होती की, दुचाकीवरील दोघेही हवेत उडून रस्त्यावर फेकले गेले. या दुर्घटनेत प्रल्हाद गायकवाड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सुनीता गायकवाड यांनी रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राण सोडले.

माजलगावमध्ये गाड्यांच्या रेसचा थरार ठरला जीवघेणा! भाजप नगरसेवकाच्या मुलाच्या कारने दाम्पत्याला उडवलं, दोघांचा मृत्यू

अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर घटनेचे गांभीर्य अधिक स्पष्ट झाले आहे. कारच्या धडकेनंतर गायकवाड दाम्पत्य रस्त्यावर दूरवर फेकले गेल्याचे दृश्य या चित्रफितीत दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, अपघातापूर्वी दोन कारमध्ये शर्यत सुरू होती. या कथित शर्यतीदरम्यान नियंत्रण सुटलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडकेनंतर दुचाकीवरील कुटुंबाला सुमारे 100 ते 150 फूट फरफटत नेण्यात आले होते.

दरम्यान, भाजप नगरसेवक दीपक मेंडके यांनी यापूर्वी आपला मुलगा गाडी चालवत नसल्याचा दावा केला होता. या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी एक व्हिडिओदेखील समोर आणला होता. मात्र, अल्पवयीन मुलगा कार चालवत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून उपलब्ध सीसीटीव्ही चित्रण, व्हिडिओ आणि इतर पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.

या दुर्घटनेमागे केवळ वाहनाचा वेग होता की दोन वाहनांमधील रेसमुळे हा अपघात घडला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. गायकवाड दाम्पत्याच्या मुलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित कारचालकाविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पालकांवरही गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणातील कारवाई अधिक गंभीर बनली आहे. अल्पवयीन मुलाला वाहन चालवण्यास परवानगी कोणी दिली, कथित रेसमध्ये आणखी कोण सहभागी होते आणि अपघाताची नेमकी परिस्थिती काय होती, या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणार आहेत.

follow us