पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड; एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर मंगेश चिवटेंचा मोठा निर्णय
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील उमेदवारीचा पेच अखेर सुटला असून मंगेश चिवटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Pune Teachers Constituency Election : पुणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत संघर्षाला आता नवं वळण मिळालं आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एकाच मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार उतरवल्यानं निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे. शिंदे गटाचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असुन त्यांच्या या निर्णयामुळे भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना दिलासा मिळाला आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यास काही तास शिल्लक असतानाच हा निर्णय समोर आला आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरुन महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. या जागेवर भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यानंतर भाजपनं कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिंदे गटानं मंगेश चिवटे यांना मैदानात उतरवल्यानं महायुतीसमोरच आव्हान उभं राहिलं होतं.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना मंगेश चिवटे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. चिवटे यांनी महायुतीतील भाजपच्या उमेदवाराविरोधात शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्यानं या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. त्यांच्या माघारीमुळे महायुतीतील उमेदवारीचा तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारीच्या समीकरणांमध्ये बदल झाले आहेत. पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे बंडखोर उमेदवार भैय्या माने यांनीही माघार घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघात स्मिता जाधव, तर शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे हे महायुतीचे उमेदवार असतील. दोन्ही मतदारसंघांतील माघारीच्या निर्णयांमुळे महायुतीतील संभाव्य मतविभाजन टाळण्याच्या दृष्टीनं महत्वाची घडामोड घडली आहे.