नाना पटोले थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण

भाजपवर टीका करणाऱ्या पटोले यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याबाबत राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 19T161008.222

Nana Patole heads straight to meet Chief Minister Fadnavis : काँग्रेसचे आक्रमक नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या पटोले यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याबाबत राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, आपण ही भेट लोकप्रतिनिधी म्हणून घेतल्याचे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 7 ते 18 डिसेंबरदरम्यान नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या नियोजनासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी आणि कामकाजाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. अधिवेशन दोन आठवडे चालवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

या बैठकीसाठी नाना पटोले मुंबईत उपस्थित होते. बैठकीचे कामकाज संपल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. नाना पटोले हे काँग्रेसमधील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. विविध राजकीय मुद्द्यांवरून त्यांनी अनेकदा भाजप आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने या भेटीमागे काही वेगळे राजकीय गणित आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हातात कॅमेरा-माईक असला म्हणजे पत्रकार होता येत नाही! रील स्टार्सना पत्रकारांचे संरक्षण देण्यास दिल्ली पोलिसांचा विरोध

विशेषतः नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर झालेल्या या भेटीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. विरोधी पक्षातील नेत्याने मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेतल्याने या भेटीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. वर्षा भेटीवरून सुरू झालेल्या चर्चांदरम्यान नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आपण मुंबईत आलो होतो. त्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे पटोले यांनी सांगितले.

राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात काहीही गैर नाही. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील तसेच राज्यातील प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे ही लोकशाही प्रक्रियेतील सामान्य बाब आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असल्याचेही समोर आले आहे. पटोले यांनी या भेटीला लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेल्या भेटीचे स्वरूप दिले असले, तरी त्यातून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांना अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही.

आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची शक्यता आहे. अशा वेळी विरोधी पक्षातील नेत्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीला विशेष महत्त्व दिले जात आहे. एकीकडे काँग्रेसकडून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही केवळ लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेली भेट होती की त्यामागे काही राजकीय समीकरणे दडली आहेत, याबाबतची उत्सुकता कायम आहे.

follow us