राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुहूर्त ठरला?, 12 डिसेंबरच्या चर्चेवर सुनील तटकरे यांचा मोठा खुलासा!
Sunil Tatkare on NCP Merger : शरद पवार यांच्या वाढदिवशी दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांवर तटकरे यांनी उत्तर दिलं आहे.
Sunil Tatkare on NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या (NCP) विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. दोन्ही पक्षांकडून अशा कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे सांगितले जात असले, तरी नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठकांमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. विशेषतः शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीबाबत तसेच १० तारखेला नेमकं काय ठरणार होतं, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या सर्व चर्चांवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देत भेटीमागील नेमकं कारण सांगितलं आहे.
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीचा विलिनीकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. प्रफुल्ल पटेल आणि माझ्यात नेहमीच चर्चा होत असते. त्यावेळी ते गोंदियाला जाणार असून १० तारखेला मुंबईत येणार असल्याची माहिती त्यांनी शरद पवार यांना दिली होती. त्यामुळे पटेल हे शरद पवार यांची भेट घेणार होते किंवा विलिनीकरणासाठी १० तारीख निश्चित करण्यात आली होती, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. या भेटीबाबत माध्यमांमध्ये वेगळे अर्थ लावले जात असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
दरम्यान, शरद पवार यांच्या १२ डिसेंबर रोजी असलेल्या वाढदिवसाच्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची घोषणा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरही तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत त्यांनी विलिनीकरणाच्या मुहूर्ताबाबतच्या दाव्यांना फेटाळले. यंदा शरद पवार ८६ वर्षे पूर्ण करून ८७ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांचा वाढदिवस देशभरातील लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. वाढदिवसाची तारीख जवळ आल्याने आणि माध्यमांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू असल्याने अशा बातम्या समोर येत आहेत. मात्र, पक्षाकडे असलेल्या माहितीनुसार विलिनीकरणाबाबत कोणत्याही वेगळ्या हालचाली सुरू नाहीत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही तटकरे यांनी दिली. दिवाळीनंतर पक्षाचे मंत्री आणि पालकमंत्री दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. प्रत्येक मंत्र्याकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार असून हे दौरे सलग तीन आठवडे चालणार आहेत.
या काळात शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळालेली मदत, पीक नुकसानीचे पंचनामे योग्य पद्धतीने झाले आहेत का आणि शेतकऱ्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, याची माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांपेक्षा पक्षाचे लक्ष सध्या दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असल्याचे तटकरे यांच्या विधानातून स्पष्ट झाले आहे.