पिंपरी-चिंचवडमधील दोन महिला पोलिसांचा समलिंगी विवाह ऐनवेळी रद्द; नेमकं काय घडलं?

women police same-sex marriage cancel पिंपरी-चिंचवडमधील दोन महिला पोलिसांचा 30 ऑगस्टला आळंदीत होणारा समलिंगी विवाह ऐनवेळी रद्द

women police same-sex marriage cancel
Pimpri-Chinchwad women cops’ same-sex marriage cancelled : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियोजित विवाहाबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. त्यांच्या बहुचर्चित समलिंगी विवाहाला ऐनवेळी ब्रेक लागला आहे. येत्या 30 ऑगस्ट रोजी तीर्थक्षेत्र आळंदी येथे वैदिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडणार होता. यासाठी त्या दोघींनी पोलीस प्रशासनाकडे रीतसर रजेचा अर्ज सादर करत लग्नपत्रिकाही जोडली होती. मात्र, आता हा विवाह रद्द झाल्याची माहिती समोर आल्याने पोलीस दलासह सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान या दोघींची ओळख झाली होती. पिंपरी-चिंचवड पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आणि काही काळ पोलीस मुख्यालयात काम केले. त्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एकाच पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली. एकत्र काम करत असताना दोघींमध्ये मैत्री निर्माण झाली आणि कालांतराने ती अधिक दृढ होत गेली.

काही वर्षांच्या सहवासानंतर दोघींनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याचे नियोजनही त्यांनी केले होते.तसेच विवाहासाठी लग्नपत्रिका छापल्या आणि नातेवाईक, जवळच्या लोकांना निमंत्रण देण्याची तयारीही त्यांनी सुरू केली होती.

‘होम मिनिस्टर’च्या नव्या पर्वाची विश्वविक्रमी सुरुवात, 2500 महिलांनी केलं आदेश बांदेकरांच औक्षण

विशेष म्हणजे, शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांचा हा विवाह असल्याने पोलीस वर्तुळात त्याची मोठी चर्चा रंगली होती. विवाहासाठी आवश्यक रजा मिळावी यासाठी दोघींनी पोलीस प्रशासनाकडे अधिकृत अर्ज केला होता. या अर्जासोबत लग्नपत्रिकाही जोडण्यात आल्याने या विवाहाची माहिती पोलीस दलात वेगाने पसरली होती.

दरम्यान, दोघींपैकी एका महिला पोलिसाच्या कुटुंबीयांचा या विवाहाला सुरुवातीपासूनच विरोध असल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे विवाह रद्द होण्यामागे कौटुंबिक विरोध हे एक प्रमुख कारण असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Gondhal : ‘गोंधळ’ च्या स्पेशल स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा महागोंधळ

मात्र, विवाह रद्द होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक दबाव, वैयक्तिक कारणे किंवा इतर काही बाबींमुळे हा निर्णय घेण्यात आला का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

या संपूर्ण घडामोडीमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात चर्चांना उधाण आले असून, सामाजिक पातळीवरही या विषयाकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344.74 कोटींची तरतूद

follow us