कोंढव्यातील बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपी निघाला मित्र, तक्रार बनावट असल्याचा पोलिसांचा खुलासा

Kondhwa Rape Case : पुण्यातील कोंढवा परिसरात एक घटना घडते, ज्यामुळे संपूर्ण पुणे… महाराष्ट्र हादरतो. २५ वर्षीय अभियंता मुलगी पोलिसांत धाव घेते आणि तक्रार देते—“एक अनोळखी कुरिअर बॉय माझ्या घरात घुसला आणि माझ्यावर बलात्कार केला!” शहरात खळबळ उडाली. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. 200 पोलिसांची पथकं, गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम—सगळेच या ‘कुरिअर बॉय’च्या शोधात धावू लागले. पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स, मोबाईल लोकेशन—सगळं बारकाईने तपासलं. पण, एकामागून एक धक्कादायक गोष्टी समोर यायला लागल्या आणि सगळं प्रकरण पलटलं.
पोलीस तपासाची सुरुवात झाली. ४८ तासांतच पोलिसांनी आरोपी असलेल्या तथाकथित कुरिअर बॉयचा शोध घेतला आणि मुसक्या आवळल्या. दरम्यान, पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. या प्रकरणात पीडितेनेच ही सगळी तथाकथित बलात्काराची स्टोरी रचल्याचं पुढे आलं आहे. ज्या ‘कुरिअर बॉय’वर हा अत्याचाराचा आरोप होता, तो प्रत्यक्षात आयटी अभियंता निघाला… शिवाय मुलीचाच ओळखीचा मित्र निघाला! युवक हा ‘कुरिअर बॉय’ नसून तरुणीचा बॉयफ्रेंडच असल्याचे पोलीस तपासात पुढे आलं. दोघेही गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. मग ही तक्रार आणि हे सगळं बलात्काराच्या तक्रारीपर्यंत कसं पोहोचलं…? हे शोधून काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला… आणि डोक्यालाच हात मारायचा तो बाकी राहिला.
घटनाक्रम असा की-
कल्याणीनगरच्या एका आयटी कंपनीत ही पीडित तरुणी काम करते. पुण्याच्या कोंढवा भागात ती तिच्या भावासोबत राहते. बुधवारी म्हणजेच घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. सायंकाळी सातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. साडे पाच वाजता या दोघांचं फोनवर बोलणं झालं होतं. भाऊ घरी नसताना मुलाच्या यायचा प्लॅन बनला… भेटायला म्हणून तो पोहोचला. गंमत म्हणजे… ती घरी एकटी असताना अनेकदा तो आधी असाच गेला आहे.
मग याचा पुरावा काय… तर… या सोसायटीच्या गेटवर असलेले जे सुरक्षा रक्षक आहेत, ते येणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नोंद करत असतात. खरं नाव सांगितलं तर तरुणीच्या घरच्यांनी… गेटवरचे रजिस्टर पाहिलं तर आपण घरी येऊन गेलो हे समजेल असा… त्यांना धोका वाटत होता. त्यामुळे, दोघांनी मिळून शक्कल लढवली. प्रत्येकवेळी मुलगा आपण कुरिअर बॉय असल्याचं गेटवर सांगत असे… त्यानंतर सुरक्षा रक्षक खातरजमा करण्यासाठी मुलीला फोन करत आणि प्रवेश देण्याबाबत विचारणा करत. त्यानंतर ती तरुणी होकार देत असे… दुजोरा द्यायची… आणि मग सुरक्षा रक्षक त्याला प्रवेश द्यायचे. अशा प्रकारे सुरक्षा रक्षकांना तो कुरिअर बॉय असल्याचं हे दोघं मिळून भासवत असत.
आता याप्रमाणे तो तिच्या घरात प्रवेश करतो… तिच्याच संमतीनं… आता पुढे नेमकं काय झालं ते पाहूयात… पोलीस तपासातून जे काही समोर आलं ते… बळजबरी करणारा युवक तरुणीचा बॉयफ्रेंडच होता. शारीरिक संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. मुलानं इच्छा व्यक्त केली. मात्र, तरुणीने मासिक पाळीचं कारण देत संबंध ठेवायला नकार दिला. मात्र, तरुणाला भावना कंट्रोल झाल्या नाहीत… त्यानं त्या परिस्थितीतही संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणीनं थेट डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग करण्यात आल्याची कथा अशाप्रकारे रंगवली. आता म्हणाल की मग तो सेल्फी आणि तो मजकूर…? दोघांनी एकत्र सेल्फी काढला. त्या सेल्फीवर ‘धमकी’चा मजकूर मुलीनं नंतर स्वतः एडिट केला होता. सीसीटीव्हीत कोणतीही जबरदस्ती, फोर्स्ड एंट्री किंवा स्प्रे वापरण्याचे पुरावे मिळाले नाहीत.
आता अजून एक धक्कादायक बाब म्हणजे… जेव्हा या प्रकरणाची तक्रार दाखल झाली… तपास सुरू झाला… माध्यमांत बातम्या यायला लागल्या… तरी या मुलाला साधी कल्पना देखील नव्हती की… ज्या कुरिअर बॉयबद्दल सगळं बोललं जात आहे तो कोणी दुसरा नसून तो स्वत: होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, तेव्हा तोही गोंधळला. शहरात नव्हे तर राज्यात ज्या प्रकरणामुळे खळबळ उडाली, त्या प्रकरणातील आरोपी आपणच आहोत याचा त्याला पत्ताच नव्हता. बाणेरमधील त्याच्या ऑफिसमध्ये त्यानं घटनेच्या दुसऱ्या दिवशी.. म्हणजेच गुरुवारी नेहमीप्रमाणे काम केलं. शुक्रवारी त्याच्या कुटुंबातील एका लग्नाला तो गेला, त्या लग्नात सहभागी झाला. पोलिसांनी त्याला त्या लग्नाच्या ठिकाणाहूनच चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याला अटक झाली नसून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. कुठेतरी मुलगा घरी आला… कोणाला तरी कळलं असेल… विषय आपल्यावर काही येऊ नये म्हणून हा प्रकार असा रंगवल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय.
सर्वात मोठी चूक म्हणजे मुलीने पोलिसांना सुरुवातीच्या तक्रारीत खोटी माहिती दिली. तिने सांगितले की, एक अनोळखी कुरिअर बॉय घरी आला आणि त्याने बलात्कार केला. प्रत्यक्षात, तो मुलगा तिचा ओळखीचा मित्र होता. कुटुंब, समाज किंवा इतर कोणत्याही दबावामुळे खोटी तक्रार करणे ही गंभीर चूक आहे. अशा बनावट प्रकरणांमुळे खऱ्या पीडित महिलांच्या तक्रारींवर संशय घेतला जातो. त्यांना न्याय मिळवताना अडचणी येतात. या प्रकरणाचा आता पोलीस तपास सुरू असून, संबंध जबरदस्तीचे होते की संमतीनं, याचा तपास अद्याप सुरू आहे.