गुणवत्ता व नीतिमत्ता हेच यशाचे खरे साथीदार; उद्योजक भरत गीते यांचे मत; महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्काराने सन्मान व प्रकट मुलाखत

Bharat Gite--जर्मनीसारख्या प्रगत देशातील स्थिर आयुष्य सोडून भारतात उद्योग उभारण्याचा निर्णय घेताना, तसेच सुरुवातीच्या अत्यंत खडतर काळात तिने खंबीरपणे साथ दिली.

  • Written By: Published:
Bharat Gite

पुणे: “ज्या भारतभूमीने आपल्याला घडवले, त्या भारताला आत्मनिर्भर बनविण्यात आपण योगदान द्यायला हवे, या भावनेतून जर्मनीहून भारतात परतलो आणि उद्योग सुरु केला. भारतीय बनावटीचे उत्पादन करून भारत आत्मनिर्भर होण्यात, तसेच युवापिढीला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण क्षेत्रात योगदान देण्यासाठी माझा प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’, तौराल इंडियाचे संस्थापक भरत गीते यांनी केले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योगांचे ग्रामीण भागात विकेंद्रीकरण व्हायला हवे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. गुणवत्ता आणि नीतिमत्ता हेच माझ्या यशाचे खरे साथीदार असल्याचे त्यांनी सांगितले.

रमामंगल सोशल फाउंडेशन आणि एक्सप्रेस मीडिया एंटरप्रायझेस यांच्या संयुक्त विद्यमाने भरत गीते यांना ‘फेस ऑफ इन्स्पिरेशन’ महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गीते यांची प्रकट मुलाखत घेत त्यांचा परळी ते जर्मनी व्हाया पुणे आणि उद्योगाची यशोगाथा उलगडली. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित सोहळ्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, महावितरणचे अधिकारी धनंजय औंढेकर, शिवसेनेचे सचिव वैभव थोरात, उद्योजक अमेय जैन, संयोजक मनिषा थोरात पिसाळ व संतोष सौंदणकर आदी उपस्थित होते.

भरत गीते यांनी आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष आणि यशाची कहाणी मोकळेपणाने मांडली. ते म्हणाले की, “या प्रवासामध्ये माझी पत्नी प्राची हिचा सिंहाचा वाटा आहे. जर्मनीसारख्या प्रगत देशातील स्थिर आयुष्य सोडून भारतात उद्योग उभारण्याचा निर्णय घेताना, तसेच सुरुवातीच्या अत्यंत खडतर काळात तिने खंबीरपणे साथ दिली. अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबात वाढलो. वडिलांनी, मोठ्या भावांनी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांचा संघर्ष मला प्रेरक ठरला. त्यातूनच जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे महत्त्व उमगत गेले.”

“जर्मनीहून पोहोचल्यानंतर अल्युमिनियम क्षेत्रात संधी असल्याचे हेरून त्यात काम सुरु केले. अल्युमिनियम हलके, गंजरोधक आणि टिकाऊ असूनही, तंत्रज्ञानाची कमतरता भारतात त्याचा योग्य प्रमाणात आणि आधुनिक पद्धतीने वापर होत नाही. यामध्ये नवे तंत्रज्ञान विकसित करून भारताला आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यापैकी ‘उद्योगांचे विकेंद्रीकरण’ हा महत्त्वाचा मुद्दा होता. उद्योग केवळ काही शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण आणि दुर्गम भागातही पोहोचले पाहिजेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

“देवेंद्र फडणवीस हे विकासाभिमुख नेतृत्व असून, राज्यातील औद्योगिक विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे उद्योगांना चालना मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वात धोरणात्मक काम करण्याची इच्छा असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उद्योग नेण्यासाठी त्यांचे पाठबळ महत्वपूर्ण ठरत आहे. येत्या काळात उद्योग आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात भरीव काम करून विकासात योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे. कोणत्याही उद्योगात गुणवत्ता आणि नीतिमत्ता या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी केवळ नफा नव्हे, तर प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य द्यावे,” असेही त्यांनी नमूद केले.

श्रीरंग बारणे म्हणाले, “शहराच्या जडणघडणीत विविध भागांतून आलेल्या लोकांचे मोठे योगदान आहे. विशेतः मराठवाडा, विदर्भातील लोकांचा यामध्ये सहभाग आहे. प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने पुण्याच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाणी समस्येवर प्रभावीपणे काम केले आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी उपलब्ध करून देणे, जलसंधारण प्रकल्प राबवणे आणि शेतकऱ्यांना आधार देणे अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला आहे.”

रवी लांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. आपण समाजाला देणे लागतो, या भावनेतून उभारलेले कार्य समाजाच्या हिताचे असते. औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक दर्जाचे ग्रंथालय, शिक्षण व साहित्य उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला, असून या उपक्रमात उद्योजकांनीही साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मनीषा थोरात पिसाळ यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. शुभांगी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष सौंदणकर यांनी आभार मानले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य जाणाऱ्या व्यक्तींना ‘फेस ऑफ इन्स्पिरेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे हे ११ वे वर्ष होते.

follow us