केंद्र सरकारचा हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न; तमिळनाडूत ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचा घणाघाती आरोप

राहुल गांधी यांनी चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तमिळ भाषा, संस्कृती, लोकशाही आणि शिक्षणासह विविध विषयांवर भूमिका मांडली.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 10T215721.169

Chhatron ki Goonj : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (Tamilnadu) चेन्नई येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात तमिळ भाषा, संस्कृती, इतिहास, लोकशाही आणि शिक्षण अशा विविध विषयांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. तमिळनाडूला प्रत्येक वेळी भेट दिल्यानंतर आपण काहीतरी नवीन शिकून परततो, असं राहुल गांधी म्हणाले. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांचे विचार ऐकणं आणि त्यांच्या प्रश्नांना जाणून घेणं हा या संवादामागचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेचा आणि इतिहासाचा अभ्यास करावा, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक स्वीकारावी आणि कोणत्याही व्यक्तीच्या म्हणण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

तमिळ भाषा, संस्कृती आणि इतिहास यांना दुय्यम स्थान देण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तमिळनाडूमध्ये हिंदी लादण्याबाबत भूमिका मांडल्याचा आरोपही त्यांनी केला. भाषा, संस्कृती आणि इतिहास हे कोणत्याही समाजाच्या ओळखीचे महत्त्वाचे आधार असतात, असं राहुल म्हणाले. लोकशाहीमध्ये नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असून मतदानाच्या माध्यमातून सत्तेवर कोण राहणार, हे ठरवण्याची संधी मिळते, असं त्यांनी नमूद केलं. मात्र, आज नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारासह त्यांच्या संस्कृतीवर आणि प्रश्न विचारण्याच्या वृत्तीवरही आघात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. एखादी गोष्ट केवळ मोठी व्यक्ती किंवा नेता सांगतो म्हणून ती स्वीकारण्याऐवजी स्वतः विचार करून तिची सत्यता तपासणं आवश्यक असल्याचं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

आठ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई, राहुल गांधी म्हणाले, एकाही देशद्रोहीला सोडलं जाणार नाही

समाजसुधारक पेरियार यांच्या विचारांचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्याचं महत्त्व पटवून दिलं. पेरियार आज असते, तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सांगितलं असतं, असा प्रश्न राहुल यांनी विद्यार्थ्यांना विचारला. त्यावर एका विद्यार्थ्यानं माणुसकीला सर्वाधिक महत्त्व देण्याचा संदेश पेरियार यांनी दिला असता, असं उत्तर दिलं. राहुल यांनीही कोणत्याही गोष्टीचं आंधळेपणानं अनुकरण करण्याऐवजी तिचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. यावेळी उत्तर चेन्नईतील नागरिकांविषयी असलेल्या नकारात्मक समजुतींचाही मुद्दा उपस्थित झाला. तेथील नागरिक अशिक्षित असून सतत वादात गुंतलेले असतात, अशी धारणा काही लोकांमध्ये असल्याचं एका विद्यार्थिनीनं सांगितलं. या समजुतीमुळे भेदभावाला सामोरं जावं लागत असल्याचं नमूद करत तिनं शिक्षण हे अशा विचारांविरोधात लढण्याचं प्रभावी माध्यम असल्याचं स्पष्ट केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा मिळत असल्याचंही तिनं सांगितलं.

संवादादरम्यान एका विद्यार्थिनीनं राहुल गांधी यांना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं. राहुल गांधी संविधानाची प्रत सोबत ठेवतात, याचा आपल्याला अभिमान वाटतो, अशी भावना तिनं व्यक्त केली. राहुल यांनी हे निमंत्रण स्वीकारत आपण नक्की येऊ, असं सांगितलं. विद्यार्थ्यांमधील विचारशक्ती त्यांना प्रश्न विचारण्यास, योग्य निर्णय घेण्यास आणि भविष्याला नवी दिशा देण्यास मदत करते, असं राहुल म्हणाले. ही विचारशक्ती भाषा, इतिहास आणि आपल्या भूमीशी असलेल्या नात्यातून विकसित होते. हा पाया मजबूत नसेल, तर जिज्ञासा कमी होऊ शकते आणि प्रश्न विचारण्याची वृत्तीही मागे पडू शकते, असं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकणं आणि त्यांचे अनुभव समजून घेणं यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला. तमिळनाडूला भेट देणं आपल्यासाठी अभिमानाची बाब असून प्रत्येक भेटीतून काहीतरी नवीन शिकायला मिळतं, असं सांगत राहुल गांधी यांनी संवादाचा समारोप केला.

follow us