मोठा राजकीय संघर्ष! डिलिमिटेशन विधेयक रोखण्यासाठी राहुल गांधी मैदानात; काँग्रेस खासदारांना प्लॅन ठरला

Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून, राहुल गांधी यांनी मोठे संकेत दिले आहेत.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 27T205042.115

Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संसदेच्या आगामी अधिवेशनात या विधेयकाला कडाडून विरोध करण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपला विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळेल, असा विश्वास असला तरी काँग्रेसने मात्र कोणत्याही परिस्थितीत या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात डिलिमिटेशनचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या संसदीय रणनीती समितीची महत्वाची बैठक शुक्रवारी खासदार सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार उपस्थित होते. बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना, विधेयक रोखण्यासाठी विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ असो किंवा नसो, काँग्रेस आपला विरोध कायम ठेवणार असल्याचे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या विधेयकाविरोधात सर्व ताकद लावण्याची तयारी ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याचे समजते.

दरम्यान, भाजपकडून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा पुढे आणला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा टप्पा गाठण्याचे भाजपचे लक्ष्य पूर्ण झाले नाही, त्यानंतर आता घटनात्मक बदलांच्या माध्यमातून राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मात्र, राहुल गांधी यांनी या बैठकीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी बैठकीला दोन्ही सभागृहांतील खासदार उपस्थित असल्याची माहिती देत शनिवारीही या विषयावर चर्चा होणार असल्याचे सांगितले.

या लढाईत काँग्रेसला इतर विरोधी पक्षांची साथ मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. राहुल गांधी यांनी द्रमुक, समाजवादी पार्टी, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या भूमिकेचा उल्लेख केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे डिलिमिटेशनविरोधातील लढाई केवळ काँग्रेसपुरती मर्यादित न राहता विरोधकांच्या व्यापक आघाडीच्या माध्यमातून लढली जाण्याची शक्यता आहे. संबंधित पक्षांच्या निर्णयांवर या विधेयकाचे संसदेतील भवितव्य अवलंबून राहू शकते.

दरम्यान, महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरही काँग्रेसने सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. लोकसभेच्या सध्याच्या 543 जागांमध्येच महिलांना 33 टक्के आरक्षण लागू करावे, अशी पक्षाची मागणी असल्याचे गौरव गोगोई यांनी स्पष्ट केले. सरकार आधी मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी आणि त्यातील कथित फेरफाराच्या माध्यमातून कोणाला मतदानाचा अधिकार मिळणार, हे ठरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेतून मतदानाचे भौगोलिक समीकरण बदलण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. त्यामुळे आगामी संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना हे दोन्ही मुद्दे केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

follow us