पॅलेट गन पीडितासाठी राहुल गांधी पोलीस ठाण्यात; FIR दाखल करण्याच्या मागणीवर ठाम

साहिलला सोबत घेऊन राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

News Photo   2026 08 21T150330.222

जंतरमंतर परिसरातील आंदोलनादरम्यान (Rahul Gandhi) पॅलेट गनच्या छऱ्यांनी जखमी झालेल्या साहिल लोहबच याच्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. साहिलच्या शरीरात 200 हून अधिक छर्रे घुसल्याचा दावा करण्यात आला असून, त्याच्या डोळ्यालाही तीन छर्रे लागले आहेत. त्यामुळे त्याची दृष्टी कायमची जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने FIR दाखल करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

साहिलला सोबत घेऊन राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांकडून FIR नोंदवून घेण्यात आली नसल्याने राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. साहिलचे आई-वडीलही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस अन् नाना पटोलेंचा मोठा दावा; ‘राष्ट्रवादीत भाजपचा स्लीपर सेल’!

दरम्यान, राहुल गांधी यांच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. दोन्ही नेते संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर पीडित साहिल आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत बसले आहेत. संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.

राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, साहिलच्या शरीरात पॅलेट गनचे 200 पेक्षा अधिक छर्रे आहेत. त्यापैकी तीन छर्रे डोळ्याला लागल्याने त्याच्या दृष्टीवर गंभीर परिणाम झाला आहे. या घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिसांनी FIR दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

गेल्या दीड तासापासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. साहिल आणि त्याचे आई-वडीलही त्यांच्यासोबत आहेत. FIR दाखल करण्याची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका राहुल गांधी यांनी घेतल्याने संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर राजकीय वातावरण तापले आहे.

follow us