खलील शेख आत्महत्या प्रकरणात रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढल्या; अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव!

खलील शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (56)

Ravindra Dhangekar’s troubles have mounted : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह एकूण 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेची शक्यता निर्माण झाल्याने धंगेकर दाम्पत्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार असून त्यापूर्वीच धंगेकर दाम्पत्य संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेले खलील शेख यांनी काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तसेच त्यांनी आत्महत्या केलेल्या घटनास्थळी दोन चिठ्ठ्या सापडल्या. त्यापैकी एक चिठ्ठी त्यांनी ज्या इमारतीत आत्महत्या केली त्या इमारतीच्या बाहेर चिकटवण्यात आली होती, तर दुसरी चिठ्ठी त्यांच्या खिशात आढळून आली. या दोन्ही चिठ्ठ्यांचा पोलिसांनी पंचनामा करून त्या तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत.

या चिठ्ठ्यांमध्ये खलील शेख यांनी आपल्या मृत्यूसाठी काही व्यक्तींना जबाबदार धरल्याचे नमूद केल्याचे सांगितले जाते. त्यामध्ये रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह अन्य काही जणांची नावे असल्याचा दावा आहे. यानंतर मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीच्या आधारे स्वारगेट पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीचा परिणाम, राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज

आर्थिक व्यवहारामुळे वाढला तणाव?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, खलील शेख हे 2011 पासून पुण्यात बांधकाम क्षेत्रात लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. विविध बांधकाम प्रकल्पांसाठी त्यांनी सेंट्रिंगचे काम केले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी खासगी सावकारांकडून व्याजाने मोठी रक्कम उचलली होती. संबंधितांकडून कामाचे पैसे आणि व्याजासह संपूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, वेळेत पैसे न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत गेला. याच आर्थिक अडचणींमुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अडीच कोटी रुपयांच्या थकबाकीचा उल्लेख

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सुमारे अडीच कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा उल्लेख केला आहे. संबंधितांकडून वारंवार पैसे मागूनही ते मिळत नसल्याने ते नैराश्यात गेल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या आर्थिक व्यवहारांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून कागदपत्रे, व्यवहारांची नोंद आणि बँक व्यवहारांची पडताळणी केली जात आहे.

‘उत्कर्ष असोसिएट’चीही चौकशी

या प्रकरणात ‘उत्कर्ष असोसिएट’ या फर्मचाही तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, या फर्ममध्ये प्रतिभा धंगेकर, बाळा शेडगे आणि रघू गौडा यांच्या पत्नी भागीदार असल्याचे समोर आले आहे. मृताच्या पत्नीने आपल्या तक्रारीत संबंधित व्यक्ती केवळ नावापुरते भागीदार असून प्रत्यक्ष व्यवहार रवींद्र धंगेकर पाहत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून फर्मशी संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे.

नाशिकमध्ये सराफाचा मोठा कारनामा; माजी महापौरांच्या कुटुंबाची 200 तोळे सोन्याची फसवणूक

पोलिसांचे म्हणणे काय ?

पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले की, मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या चिठ्ठ्या, व्हिडिओ, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची भूमिका या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. कोणाचा या प्रकरणात नेमका किती सहभाग आहे, कोणाकडून किती रक्कम देणे बाकी होते आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्यामागे कोणती कारणे होती, याचा तपास केला जात आहे.

अटकपूर्व जामिनावर सर्वांचे लक्ष

रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाचा निर्णय आणि तपासातून समोर येणारे पुरावे यावर या प्रकरणाची पुढील दिशा अवलंबून असणार आहे. दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले असून पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

follow us