‘इंस्टावर मेसेज, मग भेट आणि संबंध’ आरसीबीच्या खेळाडूवर तरूणीचे गंभीर आरोप

Sexual harassment case registered against RCB cricketer : गाझियाबादच्या एका युवतीनं RCB चा वेगवान गोलंदाजावर गंभीर आरोप केले आहे. यश दयाल असं या खेळाडूचं नाव असून इंस्टाग्रामवर या दोघांची ओळख झाली होती. सुरुवातीला साध्या मेसेजेसपासून संवाद सुरू झाला. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली, फोनवर गप्पा, व्हिडिओ कॉल्स आणि शेवटी प्रत्यक्ष भेट. युवतीने सांगितलं की, पहिल्यांदा भेटल्यावरच यशला ती खूप जवळची वाटू लागली. काही महिन्यांतच नातं इतकं गहिरं झालं की, तिने यशवर आणि त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. मात्र शेवट काही वेगळाच झाला.
यश दयालने त्या युवतीला आपल्या कुटुंबाशी भेटवलं. त्याच्या घरच्यांनाही ती आवडली. दोघं अनेकदा एकत्र फिरायला गेले. IPL मॅचेस, कुटुंबीयांसोबत फोटो, व्हिडिओ आणि सोशल मीडियावर स्टोरीज यांत हे सगळे सोबत दिसतात. युवतीने सांगितलं की “माझं आयुष्य स्वप्नासारखं वाटत होतं. त्याच्या घरच्यांनीही मला स्वीकारलं, यशने लग्नाचं वचनही दिलं होतं.” ५ वर्षांच्या नात्यात यशने तिला वारंवार लग्नाचं वचन दिलं. या वचनावरच दोघांमध्ये शारीरिक संबंध तयार झाले. युवतीचा दावा आहे की, “माझं भावनिक, मानसिक आणि शारीरिक शोषण झालं. मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला.” या काळात यशने आर्थिक मदतीची मागणीही केली होती, असंही तिने तक्रारीत नमूद केलं आहे
काही काळानंतर युवतीला यशच्या वागण्यात बदल जाणवू लागला. तिने त्याच्यावर इतर मुलींशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र त्याने याला विरोध करत तिच्यावर शारीरिक आणि मानसिक आघात केल्याचे आरोप तिने केले आहेत. “मी त्याला विचारलं असता त्याने मला मारलं, नंतर माफीही मागितली. या सगळ्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेली होती,” असं या युवतीनं सांगितलं आहे.
युवतीकडे चॅट्स, व्हिडिओ कॉल्स, फोटोज, स्क्रीनशॉट्स असे डिजिटल पुरावे आहेत, असं तिचं म्हणणं असून १४ जूनला तिनं महिला हेल्पलाईन १८१ वर कॉल केला, पण काहीच झालं नाही. शेवटी २१ जूनला मुख्यमंत्री हेल्पलाईनवर तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून इंदिरापुरम पोलीस ठाण्यात FIR दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तिचा आरोप आहे की, यश दयालचे इतर मुलींशीही संबंध आहेत. काही मुलींनी तिला याची माहिती दिली, पुरावे दाखवले. “पैसा, प्रसिद्धी आणि पॉवर वापरून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय,” असंही तिने म्हटलं आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडिया, क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.