बीडमध्ये उभारणार सिल्क साडी उद्योग! 10 वर्षांत ‘सिल्क बीड’ म्हणून नवी ओळख निर्माण करण्याचा जिल्हाधिकार्यांचा संकल्प

Silk Industry in Beed : बीड जिल्ह्यात रेशीम धाग्यापासून सिल्क साड्यांची निर्मिती करणारा वस्त्रोद्योग प्रकल्प उभारण्याची संकल्पना.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 27T141319.716

Silk Industry in Beed : जालना जिल्ह्याच्या धर्तीवर आता बीड जिल्ह्यातही रेशीम उद्योगाला चालना देण्याची तयारी सुरू झाली आहे. रेशीम धाग्यापासून आकर्षक सिल्क साड्यांची निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र वस्त्रोद्योग प्रकल्प उभारण्याची संकल्पना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मांडली आहे. रेशीम उत्पादनापासून साडी निर्मितीपर्यंतची संपूर्ण साखळी बीडमध्ये विकसित करण्याचे नियोजन असून, आगामी 9 ते 10 वर्षांत ‘सिल्क बीड’ अशी जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बीड येथील वेदभवनमध्ये बुधवारी (ता. 25) जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने केंद्र सरकारच्या सिल्क समग्र-2 योजनेंतर्गत निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाधिकार्यांनी रेशीम शेतीला केवळ शेतीपूरक व्यवसाय न ठेवता त्याला औद्योगिक स्वरूप देण्याची गरज अधोरेखित केली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 200 हून अधिक गावांमध्ये तुती लागवड, रेशीम उत्पादन आणि फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. या उत्पादनाला वस्त्रोद्योगाची जोड मिळाल्यास शेतकर्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळू शकते.

बीडमध्ये दुष्काळाचा विळखा घट्ट; शेतकरी संकटात, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

रेशीम धाग्यापासून सिल्क साड्या तयार करण्यासाठी स्थानिक पातळीवर उद्योग उभारल्यास महिलांसाठी वस्त्रनिर्मिती, शिवणकाम आणि इतर संबंधित क्षेत्रांत रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर रेशीम शेतीच्या विस्तारासाठी पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी व्हीबी-जी-राम-जी योजनेच्या माध्यमातून रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याची ग्वाही दिली. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रेशीम विकास अधिकारी शंकर वराट यांनी दुष्काळी परिस्थितीत तुती लागवड आणि संगोपनासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती दिली. प्रशिक्षणार्थींना 5 दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार असून, 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील अंडीपुंज केंद्रावर 2 दिवसीय अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला. कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी गर्जे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us