खा. डॉ. ज्योती वाघमारेंनी पंतप्रधानांना भेट दिली ‘मोदींची प्रतिमा विणलेली’ चादर; सोलापूरच्या वस्त्रोद्योगासाठी आंतरराष्ट्रीय धोरणाची मागणी

खा. डॉ. ज्योती वाघमारेंनी पंतप्रधानांना भेट दिली 'मोदींची प्रतिमा विणलेली' चादर; सोलापूरच्या वस्त्रोद्योगासाठी आंतरराष्ट्रीय धोरणाची मागणी

93d27bc0 Fe7a 4667 B4af 68aceb533f86

SOLAPUR-BLANKET-MODI-JYOTI-WAGHMARE: राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य साधत शिवसेना राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सोलापूरची जागतिक ओळख आणि गौरव मानल्या जाणाऱ्या हातमाग परंपरेचे प्रतीक असलेली विशेष सोलापुरी चादर पंतप्रधानांना भेट दिली. अत्यंत कलात्मकतेने विणलेल्या या चादरीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुबेहूब प्रतिमा विणण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या आणि अद्वितीय भेटीमुळे सोलापूरच्या समृद्ध हातमाग परंपरेचे, विणकरांच्या कौशल्याचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन राष्ट्रीय पटलावर घडले आहे.

पंतप्रधानांकडून सोलापुरी कलाकृतीचे मनापासून कौतुक
एनडीएच्या (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) नवनिर्वाचित राज्यसभा आणि लोकसभा खासदारांसाठी आयोजित विशेष अल्पोपहार कार्यक्रमादरम्यान डॉ. ज्योती वाघमारे यांनी ही अनोखी चादर पंतप्रधानांना सुपूर्द केली. चादरीवरील स्वतःची नयनरम्य प्रतिमा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष आनंद व्यक्त केला. सोलापूरच्या विणकरांनी जपलेले हे अथांग कौशल्य आणि कलाकुसर ही देशाची अमूल्य सांस्कृतिक परंपरा असल्याचे सांगत पंतप्रधानांनी या कलाकृतीचे मनापासून कौतुक केले. एवढेच नव्हे तर, सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला आणि टेक्स्टाईल क्षेत्राला पुन्हा नवऊर्जा व उभारी देण्यासाठी केंद्र सरकार अत्यंत सकारात्मक पावले उचलेल, अशी ठाम ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

सोलापुरी चादरीसाठी ‘आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग’ धोरणाची ठाम मागणी
या महत्त्वाच्या संवादादरम्यान खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी सोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी पंतप्रधानांकडे महत्त्वपूर्ण मागणी केली. त्या म्हणाल्या, “सोलापुरी चादरीला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रस्थापित ब्रँड बनवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष धोरण आखणे गरजेचे आहे. जर सोलापुरी चादरीला व्यापक जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली, तर सोलापूरच्या संपूर्ण वस्त्रोद्योगाला एक नवी दिशा आणि मोठी चालना मिळेल. यामुळे सोलापूरमधील हजारो हातमाग कामगार, विणकर, लघुउद्योजक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.” सोलापुरी चादर हे केवळ एक व्यापारी उत्पादन नसून ती सोलापूरच्या अस्मितेची आणि कामगारांच्या श्रमसंस्कृतीची जागतिक ओळख आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

प्रतिकूल परिस्थिती ते संसदेचा टप्पा: डॉ. वाघमारेंचा संघर्षमय प्रवास
या औपचारिक भेटीदरम्यान डॉ. वाघमारे यांनी आपल्या वैयक्तिक संघर्षाचा प्रवासही पंतप्रधानांसमोर मांडला. अत्यंत प्रतिकूल आणि गरिबीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत इंग्रजी विषयात ‘पीएच.डी.’ (Ph.D.) पदवी पूर्ण करेपर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास ऐकून पंतप्रधान प्रभावित झाले. एका गरीब कुटुंबातील आणि आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या मुलीला शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेवर पाठवून देशसेवेची मोठी संधी दिली, याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या संवादात त्यांनी एक रंजक उल्लेख करत सांगितले की, त्या राहत असलेल्या भागाचे नावही योगयोगाने ‘मोदी परिसर’ असेच आहे.

पंतप्रधानांकडून संघर्षाची दखल आणि उपमुख्यमंत्र्यांप्रती सद्भावना
डॉ. ज्योती वाघमारे यांच्या कठीण संघर्षाची, जिद्दीची आणि शैक्षणिक वाटचालीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या भावी संसदीय आणि सामाजिक कार्यासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांच्याप्रतीही विशेष सद्भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस नितीन नवीन यांच्यासह एनडीएचे नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते.

सोलापूरला पुन्हा ‘वस्त्रोद्योगाची राजधानी’ बनवणार: डॉ. ज्योती वाघमारे

पंतप्रधानांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या:
“सोलापुरी चादरीला जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणे ही माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे. सोलापूरच्या ऐतिहासिक हातमाग आणि टेक्स्टाईल उद्योगाला नवसंजीवनी मिळावी, प्रत्येक विणकराच्या हाताला हक्काचे काम मिळावे आणि सोलापूरने गमावलेले ‘वस्त्रोद्योगाची राजधानी’ हे स्थान पुन्हा देशभरात व जगात मानाने उभे राहावे, यासाठी मी संसदेत आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या कणखर नेतृत्वाखाली सर्वसामान्य, कष्टकरी, वंचित, शोषित आणि कामगार वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी मी अधिक ताकदीने आणि निष्ठेने कार्य करत राहीन.”

follow us