बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; जलाभिषेकासाठी आलेल्या 7 भाविकांचा मृत्यू, 12 हून अधिक जखमी

लखीसराय जिल्ह्यातील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावण सोमवारी दर्शन आणि जलाभिषेकासाठी आलेल्या भाविकांवर दुर्दैवी प्रसंग ओढावला.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (77)

Stampede at Ashokdham Temple : बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावण सोमवारी दर्शन आणि जलाभिषेकासाठी आलेल्या भाविकांवर दुर्दैवी प्रसंग ओढावला. मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर लखीसराय सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराच्या दर्शनासाठी आणि जलाभिषेकासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात येत असल्याने परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात सुमारे 50 हजार भाविकांची उपस्थिती होती. पहाटेपासूनच दर्शनासाठी आणि जलाभिषेकासाठी रांगा लागल्या होत्या. याच दरम्यान अचानक विजेची एक तार तुटून गर्दीच्या दिशेने पडल्याची घटना घडली. तार पडल्याची माहिती पसरताच भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणांतच लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. घबराटीमुळे अनेक जण एकमेकांवर पडले आणि चेंगराचेंगरी झाली.

जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसहा ते पावणेसातच्या दरम्यान एकाच वेळी दोन रेल्वेगाड्या लखीसराय येथे दाखल झाल्या. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक एकाचवेळी मंदिर परिसरात पोहोचले. प्रशासनाने गर्दी लक्षात घेऊन बॅरिकेडिंगसह आवश्यक व्यवस्था केली होती. मात्र, भाविकांचा दबाव इतका वाढला की एका बाजूचे बॅरिकेडिंग तुटले. त्यानंतर लोकांचा तोल गेला आणि अनेक जण एकमेकांवर कोसळले. यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.

UGC-NET च्या 3 पेपरमध्ये स्पेलिंग अन् प्रिटिंगमध्ये चुका; NTA च्या कबुलीनंतर फेरपरीक्षेची तारीख जाहीर

या दुर्घटनेत अनेक महिला, वृद्ध आणि लहान मुलांनाही फटका बसला. विशेषतः महिलांची संख्या अधिक असल्याने त्यांना गर्दीतून बाहेर पडणे कठीण झाले. काही महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अचानक झालेल्या गोंधळामुळे लोकांना काय घडत आहे हे समजण्यापूर्वीच परिस्थिती गंभीर बनली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन सेवा आणि वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकांनी जखमींना गर्दीतून बाहेर काढून रुग्णवाहिकांद्वारे लखीसराय सदर रुग्णालयात दाखल केले. काही जखमींना प्राथमिक उपचारानंतर विशेष वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, काही जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

मुद्दे वाढवू नका अन् मुद्दे भरकटवू नका; छ. संभाजीनगरात आंदोलनात दिपकेंसमोर DCP नवलेंचं वक्तव्य

घटनेनंतर मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भाविकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरू केला असून विजेची तार तुटण्यामागील कारण आणि गर्दी व्यवस्थापनात काही त्रुटी होत्या का, याची चौकशी केली जात आहे.

श्रावण महिन्यातील धार्मिक उत्सवांदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अशा ठिकाणी अधिक प्रभावी गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा उपाययोजनांची गरज असल्याची चर्चा या घटनेनंतर पुन्हा सुरू झाली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण बिहारमध्ये शोककळा पसरली असून मृत भाविकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जात असून पुढील मदत आणि सहाय्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

follow us