सांगली जिल्हा बँकेच्या निकालात रोहित पाटील गटाला दोन धक्के; सुमनताईंचा पराभव, घोरपडे विजयी

Sangli District Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुमनताई पाटील यांच्या पराभवामुळे रोहित पाटील गटाला धक्का.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 03T140457.159

Sangli District Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, जत, कवठेमहांकाळ आणि तासगावमधील प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला आहे. (Bank) विशेषतः तासगावमध्ये सुमनताई पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाल्याने आमदार रोहित पाटील यांच्या गटाला धक्का बसला आहे. मिरज सोसायटी गटातून अण्णासाहेब कोरे, अनुसूचित जाती गटातून काँग्रेसचे कृष्णा कांबळे आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातून राष्ट्रवादीचे संभाजी कचरे विजयी झाले आहेत.

जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी रविवारी मतदान पार पडले होते. एकूण 2,446 मतदारांपैकी 2,297 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे 93.91 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मंगळवारी सकाळी मिरज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. यासाठी आठ टेबलची व्यवस्था करण्यात आली होती आणि 25 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला मतपत्रिकांचे 25-25 चे गठ्ठे तयार करून त्यांचा हिशेब पूर्ण करण्यात आला. त्यानंतर सोसायटी गट, अनुसूचित जाती तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातील मतमोजणी स्वतंत्र टेबलवर करण्यात आली.

अहिल्यानगर जिल्हा बँक आता शेतकऱ्यांची बँक म्हणून काम करणार; विजयानंतर निलेश लंके स्पष्टच बोलले

जत सोसायटी गटातील निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहिली. या लढतीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी 54 मते मिळवत विनोद पवार यांचा पराभव केला. पवार यांना 34 मते मिळाली असून, पडळकर यांनी 20 मतांच्या फरकाने विजय नोंदवला. दुसरीकडे कवठेमहांकाळ सोसायटी गटात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी तानाजी पाटील यांच्यावर मात केली. घोरपडे यांना 37, तर तानाजी पाटील यांना 33 मते मिळाली. अवघ्या चार मतांनी घोरपडे यांनी ही लढत जिंकली.

तासगाव सोसायटी गटातील निकालाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सुमनताई पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. संजयकाका पाटील यांना 40, तर सुमनताई पाटील यांना 38 मते मिळाली. या विजयामुळे आमदार रोहित पाटील यांच्या गटाला राजकीय धक्का बसला आहे. मिरज सोसायटी गटातही अण्णासाहेब कोरे यांनी 47 मते मिळवत अनिल शेगुणशे यांचा पराभव केला. शेगुणशे यांना 19 मते मिळाली असून, कोरे यांनी 28 मतांच्या फरकाने विजय मिळवला.

अनुसूचित जाती गटातून काँग्रेसचे कृष्णा धोंडी कांबळे यांनी 1,914 मते मिळवून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी विलास पांडुरंग बेले यांना 176, तर बाबासाहेब मधाळे यांना 112 मते मिळाली. विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय गटातून संभाजी बाबुराव कचरे यांनी 1,974 मते मिळवत विजय नोंदवला. अमित शंकर पारेकर यांना 189, तर शंकर माने यांना 46 मते मिळाली. निकाल जाहीर होताच शेतकरी भवन परिसरात समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. पडळकर यांच्या समर्थकांनी मिशन हॉस्पिटल चौकात जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळण्याची व्यवस्था केली होती. विजयी उमेदवारांना हार घालण्यासाठी क्रेनही लावण्यात आली होती.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी बँकेच्या काही जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष सहा जागांच्या निकालानंतरही बँकेवर सत्ता कोणाची येणार, याबाबत उत्सुकता कायम आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, काँग्रेसने चार जागा बिनविरोध आणि दोन जागा निवडणुकीत जिंकत एकूण सहा जागा मिळवल्या आहेत. भाजपने चार जागा बिनविरोध मिळवल्या असून, गोपीचंद पडळकर यांच्या विजयामुळे त्यांची संख्या पाच झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा बिनविरोध आणि एक जागा निवडणुकीत मिळून चार जागा मिळाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीतील विजयासोबतच बँकेच्या सत्तास्थापनेच्या गणिताकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

निकाल 

जत — गोपीचंद पडळकर — ५४
कवठेमहांकाळ — अजितराव घोरपडे — ३७
तासगाव — संजयकाका पाटील — ४०
मिरज — अण्णासाहेब कोरे — ४७
अनुसूचित जाती — कृष्णा कांबळे — १९१४
विमुक्त जाती — संभाजी कचरे — १९७४

follow us