Video : राष्ट्रवादी मनसे अन् ट्रम्प यांच्या नेतृत्वात…,पक्षांंतराच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून 'ऑपरेशन टायगर-3' ची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कधी भाजपसोबत (NCP) जाणार कधी काँग्रेससोबत जाणार अशा चर्चा आहेत. त्यावरून आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्कील शैलीत भाष्य केलं आहे. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळा कार्यक्रमात बोलताना त्यांनी पक्षांतराच्या चर्चांवर प्रतिक्रया दिली आहे.
आमचा 8 खासदारांचा व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे. आम्हाला टीव्हीवर रोज नवीन पक्षात पाठवलं जात आहे. आम्ही त्या ग्रुपवर गमतीने बोलतो की, आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलं आहे. आम्हाला कमोडिटी करून ठेवलं आहे. याने अस्वस्थ आहोत, दुर्दैव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आता इंटरनॅशनल करून टाका. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार. आम्हाला आता जोक केलं जात आहे हे दुर्दैव आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राष्ट्रवादी विलीनीकरण अन् एनडीएसोबत जाणार का?, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलं क्लिअर
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर-3’ ची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर आता या नव्या मोहिमेत ठाकरे गटासोबतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार आणि खासदारही शिंदे गटाच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संबंधित लोकप्रतिनिधींसोबत सातत्याने गुप्त बैठका आणि संपर्क सुरू आहेत.
शिंदे गटातील सूत्रांचा दावा आहे की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 10 आमदारांचे शिंदे गटात येण्यासाठी मतपरिवर्तन करण्यात आले आहे. मात्र, पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ नये, यासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणखी 5 आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
याशिवाय, ठाकरे गटातील आणखी एका खासदाराशी (MP) संपर्क साधण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. ‘ऑपरेशन टायगर-3’ ची जबाबदारी माजी मंत्री तानाजी सावंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय निलेश देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.