नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला, तुळजाभवानीची ज्योत घेऊन येणाऱ्या तीन भाविकांचा अपघातात मृत्यू
कचनेर फाट्याजवळ दुचाकीला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
Three devotees die in an accident : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आई तुळजाभवानीची ज्योत घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर ज्योत घेऊन जाणारा 20 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कचनेर फाट्याजवळ शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर टेम्पोला अडकलेली दुचाकी तब्बल दोन किलोमीटरपर्यंत फरफटत गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोळेगाव गदाना गावातील काही तरुण तुळजापूर येथून आई तुळजाभवानीची ज्योत घेऊन आपल्या गावी परतत होते. गाव अवघ्या 40 ते 50 किलोमीटर अंतरावर असतानाच कचनेर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर ज्योत घेऊन जाणारा शुभम आधाने हा तरुण गंभीर जखमी झाला.
‘मोगॅम्बो मोदी लोकशाही उद्ध्वस्त करतायत, आपण मिळून मोदींचा पराभव करू’, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
या अपघातात अक्षय बिजलसिंग राजपूत (वय 28), अमोल अशोक औटे (वय 32) आणि गोरख रावसाहेब म्हसकर (वय 28) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर शुभम आधाने (वय 20) याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त देवीची ज्योत घेऊन घरी परतणाऱ्या तरुणांवर वाटेतच काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. धडकेनंतर दुचाकी टेम्पोला अडकली आणि ती सुमारे दोन किलोमीटरपर्यंत फरफटत गेली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला मदत केली आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. यानंतर पोलिसांनाही अपघाताची माहिती देण्यात आली.
करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय सुरुवातीलाच घडलेल्या या भीषण अपघातामुळे गोळेगाव गदाना गावावर शोककळा पसरली आहे.