सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये मोठे बदल, पुढील दोन महिने दर्शनासाठी मंदिर राहणार बंद

संभाव्य नियोजनानुसार, येत्या 15 किंवा 16 ऑक्टोबरपासून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश बंद केला जाण्याची शक्यता आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 09T080042.777

Trimbakeshwar Temple to remain closed for two months : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मंदिर परिसरातील विकासकामे, रस्ते विस्तारीकरण आणि भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर मंदिर सुमारे दोन महिने भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचे नियोजन सुरू आहे. संभाव्य नियोजनानुसार, येत्या 15 किंवा 16 ऑक्टोबरपासून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश बंद केला जाण्याची शक्यता आहे.

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, मंदिर बंद ठेवण्याची अंतिम तारीख आणि कालावधी याबाबत देवस्थान ट्रस्टकडून अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले, तरी श्री त्र्यंबकेश्वराची धार्मिक परंपरा कायम राहणार आहे. मंदिरातील नित्यपूजा, त्रिकाल पूजा आणि अन्य पारंपरिक धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहतील. त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

‘नटसम्राट’ नाना पाटेकर अनंतात विलीन; साश्रू नयनांनी चाहत्यांचा भावपूर्ण निरोप

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जाणार असल्याने गर्दीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कामांच्या ठिकाणी अपघात होऊ नयेत, तसेच चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी दर्शन काही काळासाठी बंद ठेवण्याचा पर्याय विचाराधीन आहे. दरम्यान, सध्या पितृपक्षाच्या निमित्ताने देशभरातून हजारो भाविक त्र्यंबकेश्वर येथे पितृकर्म आणि विविध धार्मिक विधींसाठी दाखल होत आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी देवस्थान ट्रस्टने 12 ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, केंद्र किंवा राज्य शासन तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या राज्यशिष्टाचाराशी संबंधित पत्रांना यातून अपवाद ठेवण्यात आला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर शहर आणि मंदिर परिसरात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते विस्तारीकरण आणि भाविकांच्या सोयीसाठी विविध कामे प्रस्तावित आहेत. कुंभमेळ्यादरम्यान देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आणि साधू-महंत त्र्यंबकेश्वर येथे येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून आतापासूनच तयारीला वेग देण्यात येत आहे. मंदिर परिसरातील गर्दी नियंत्रित केल्यास विकासकामे सुरक्षितपणे आणि वेगाने पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

अंबानी हेच भारताचे खरे बॉस आहेत का? स्टारलिंकला परवान्यावरून एलन मस्क यांचा सरकारला सवाल

त्यामुळे कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने मंदिरातील दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आता त्र्यंबकेश्वर मंदिर नेमक्या कोणत्या तारखेपासून बंद राहणार आणि दर्शनबंदीचा कालावधी किती असेल, याबाबत देवस्थान ट्रस्टच्या अधिकृत घोषणेकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. दर्शनासाठी जाण्याचे नियोजन करणाऱ्या भाविकांनी प्रवासापूर्वी अधिकृत सूचना तपासून घ्याव्यात.

follow us