Video : शिशु आहारावर तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, पॅकेजवर आईच्या दुधाबाबत स्पष्ट सुचना अनिवार्य
Tukaram Mundhe Press : शिशु आहाराच्या उत्पादनांवर आता कडक नियम लागू करण्याचा मोठा निर्णय एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर केला आहे.
Tukaram Mundhe Press : शाळांमधील बॅलन्स डाएट आणि पनीरच्या गुणवत्तेबाबत (FDA) आदेश काढल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाकडुन शिशु आहाराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि चांगलं अन्न मिळावं हा एफडीएचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत एफडीएकडुन ११ आदेश काढण्यात आले असुन त्याचा परिणाम दिसत असल्याचंही मुंढे यांनी स्पष्ट केलं.
दोन वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आहाराचा प्रश्नही महत्वाचा असल्याचं मुंढे यांनी सांगितलं. २२ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी असलेले नियम १८ वर्षांपर्यंत लागू आहेत. मात्र अंगणवाडीत जाण्यापुर्वीच्या शिशुंसाठीही काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. सात महिन्यांपर्यंत ब्रेस्ट मिल्कशिवाय दुसरं काही देणं अपेक्षित नाही. राज्यभरातील औषध दुकानं आणि वितरकांकडुन माहिती घेतल्यानंतर आईचं दूध हेच शिशुसाठी सर्वोत्तम असल्याचं निदर्शनास आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
शिशु आहारातून मुलाला आवश्यक न्युट्रीशन मिळत नसल्याचंही एफडीएच्या पाहणीत समोर आलं आहे. त्यामुळे अशा उत्पादनांच्या पॅकेटवर काही अनिवार्य सुचना देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचं पालन होत नसल्याचं मुंढे यांनी सांगितलं. आता पॅकेजवर आईचं दूध सर्वोत्तम दूध असल्याचं स्पष्टपणे नमुद करावं लागणार आहे. तसेच आई आणि मुलाचं चित्र अशा उत्पादनांवर वापरता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
FDA अधिकारी ब्लॅकमेल करून पैसे घेतात अन्… संजय राऊताचं थेट तुकाराम मुंढेंना पत्र
या नव्या आदेशाचा थेट परिणाम पुरवठादार, ब्रँड मालक आणि ई कॉमर्स विक्रेत्यांवर होणार आहे. पॅकेजवर शिशुला हे अन्न कधी आणि कशा पद्धतीनं द्यावं याची माहिती देणं आवश्यक राहणार आहे. फॉर्म्युला मिल्कवर बंदी नसली तरी त्यासाठी ठरवुन दिलेले नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. उत्पादनाच्या पॅकेजवर मेडिकल प्रिस्क्रिप्शनच्या सल्ल्यानुसार वापर करावा, हा एकमेव पर्याय नाही आणि सहा महिन्यांनंतर वापर करावा, अशा सुचनाही द्याव्या लागणार आहेत.
आईच्या दुधाला पर्याय किंवा त्याच्या समकक्ष असल्याचं भासवुन कोणत्याही शिशु आहार उत्पादनाची जाहिरात करता येणार नाही. अशा उत्पादनांचा प्रचार करण्यावरही निर्बंध असतील. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोफत नमुने किंवा कुपन देण्यासही मनाई करण्यात आली आहे. सेव्ह फूड, सेव्ह ड्रग या संकल्पनेनुसार अन्न आणि औषध सुरक्षित मिळणं आवश्यक आहे. आतापर्यंत २२ रेग्युलेशन देण्यात आल्याचंही मुंढे यांनी सांगितलं.
दरम्यान, चुकीच्या आहाराचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा मुंढे यांनी केला. सहा महिन्यांखालील मुलांना आईचं दूध देण्याचं प्रमाण ६५ टक्क्यांवरुन ५८ टक्क्यांपर्यंत घसरलं आहे. शहरी भागात स्तनपानाचं प्रमाण ५२ टक्के तर ग्रामीण भागात ७५ टक्के आहे. बाळ जन्मल्यानंतर एका तासाच्या आत स्तनपान देण्याचं प्रमाणही कमी आहे आणि महाराष्ट्रातील सुमारे ५० टक्के माता बाळ जन्मल्यानंतर तासाभरात स्तनपान देत नसल्याचं त्यांनी सांगितलं. याचा आरोग्यावर परिणाम होत असुन १० ते १२ वर्षांच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण ३५ टक्के तर १० ते १९ वयोगटात मधुमेहाचं प्रमाण १२ टक्के असल्याची आकडेवारी त्यांनी मांडली.