मतदानाचा हक्क हिरावलात तर… उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा; गर्जना मोर्चात जोरदार हल्लाबोल

Uddhav Thackeray Voting Rights Warning : ठाकरे बंधुंच्या गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांसह निवडणुक आयोगावर गंभीर आरोप केले.

News Photo   2026 10 04T142911.845

Uddhav Thackeray Voting Rights Warning : मुंबईत ठाकरे बंधुंच्या गर्जना मोर्चाला आज मोठा प्रतिसाद मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. (SIR) केंद्रीय निवडणुक आयोग, मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पश्चिम बंगालमधील राजकारणावर त्यांनी टीकेची झोड उठवली. निवडणूक प्रक्रियेपासुन सरकारच्या कारभारापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशाराही दिला.

मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय फौजा पाठवल्या होत्या, याची आठवण करुन देत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. स्वतःचा पक्ष निवडणुकीत विजयी व्हावा म्हणुन पश्चिम बंगालमध्ये एका महिलेविरोधात फौज उतरवली जात असल्याची टीका त्यांनी केली. निवडणुक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत सरन्यायाधीशांना बाजुला करुन अमित शाह यांना स्थान देण्यात आलं आणि त्यानंतर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप करत या नियुक्तीवरच त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.

‘निवडणूक आयोगामुळेच एवढा माज आलाय’; राज ठाकरेंनी गर्जना मोर्चात भाजपचा ‘माज’च काढला!

लोकशाहीच्या सद्यस्थितीवरुन उद्धव ठाकरे यांनी अंधभक्तांनाही लक्ष्य केलं. सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे विरोध नव्हे, तर लोकशाही वाचवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपला सरकार चालवता येत नसुन प्रशासनाचा वापर राजकीय सुडासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाण्यातील घटनेचा उल्लेख करत त्यांनी पोलिस आणि गृहमंत्र्यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला. देशभर महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असताना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारला याचं गांभीर्य दिसत नाही का, असा सवालही त्यांनी केला.

राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. सत्ताधाऱ्यांचं लक्ष जनतेच्या प्रश्नांपेक्षा पक्ष फोडण्याकडे असल्याचा आरोप करत त्यांनी मतदारांच्या अधिकाराचाही मुद्दा उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारसंख्येत झालेल्या वाढीचा संदर्भ देत त्यांनी SIR प्रक्रियेवर आणि निवडणुक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ज्ञानेश कुमार हे सत्ताधाऱ्यांच्या हातातील हत्यार असल्याचा आरोप करत मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं.

न्यायसंस्था आणि प्रशासनावर प्रभाव निर्माण केला असला तरी रस्ते आणि लोकशाहीची ताकद जनतेच्या हातात असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. जनतेच्या अधिकारांवर गदा आणली तर त्याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील, असा थेट संदेश त्यांनी दिला. देशात यापुर्वीच्या सरकारांच्या काळात विरोधकांवर टीका झाली असली तरी सध्याच्या सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचा दावा त्यांनी केला. एकेकाळी सत्ताधाऱ्यांविरोधात बोलताना लोक घाबरत होते, मात्र आता ती भीती राहिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मतदानाचा अधिकार हा जनतेच्या लोकशाही हक्काचा महत्वाचा भाग असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोग आणि सत्ताधाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला. आमचा मतदानाचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न झाला तर जनता शांत बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. आज लोकशाहीच्या रक्षणासाठी पाऊल उचललं आहे, मात्र जनतेचे अधिकार आणखी हिरावले गेले तर त्याचा प्रतिकार अधिक तीव्र होईल, असा इशारा त्यांनी दिला. ठाकरे बंधुंच्या मोर्चाच्या माध्यमातुन निवडणुक प्रक्रिया, मतदारांचा अधिकार आणि सरकारच्या कारभाराविरोधात विरोधकांनी एकत्रितपणे आवाज उठवण्याचा प्रयत्न केला.

follow us