व्हाट्सअँपवर ‘नो’ असा रिप्लाय देण्याआधी सावधान! सायबर फसवणुकीचा नवा प्रकार चर्चेत
हैद्राबाद पोलिसांनी एका संशयास्पद मेसेजच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढण्याच्या प्रकाराबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
A new type of cyber fraud in the spotlight : आजच्या डिजिटल युगात व्हाट्सअँपचा वापर कोट्यवधी लोक करतात. कुटुंबीय आणि मित्रांशी संवाद साधण्यापासून ते महत्वाची माहिती आणि कागदपत्रे पाठ्वण्यापर्यंत अनेक कामांसाठी या अँपचा वापर केला जातो. मात्र, आता याच व्हाट्सअँपच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीबाबत नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. हैद्राबाद पोलिसांनी एका संशयास्पद मेसेजच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढण्याच्या प्रकाराबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, अलीकडेच एका चाटर्ड अकाउंटंटला अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे.
हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी देखील नागरिकांना अनोळखी मेसेजपासून सावध राहण्याचा आणि संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. नेमका काय आहे व्हाट्सअँप वरील ‘नो’ स्कॅम? या प्रकारात सायबर भामटे अनोळखी नंबरवरून नागरिकांना व्हाट्सअँप मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले गेल्याचे सांगितले जाते. तसेच, तुम्ही हा व्यवहार केला नसेल, तर उत्तरादाखल ‘नो’ असे लिहून पाठवण्यास सांगितले जाते. बँक खात्यातून पैसे गेल्याची माहिती वाचून अनेक जण घाबरतात आणि कोणतीही खातरजमा न करता मेसेजला उत्तर देतात. सायबर गुन्हेगार याच भीतीचा आणि घाईचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात.
फक्त ॲप डिलीट करून उपयोग नाही! ट्रू कॉलरवरून नंबर हटवण्यासाठी काय कराल?
मात्र, व्हाट्सअँप वर केवळ ‘नो’ असा रिप्लाय दिल्याने फोन हॅक होतो किंवा बँक खात्यातील पैसे चोरीला जातात, असे प्रत्येक प्रकरणात घडतेच असे नाही. त्यामुळे अशा मेसेजमुळे घाबरून न जाता त्याची सत्यता तपासणे आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे महत्त्वाचे आहे. अनेकांना असे वाटते की, बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी ओटीपी किंवा पासवर्ड आवश्यक असतो. मात्र, सायबर गुन्हेगार बनावट मेसेज, फसव्या वेबसाइटच्या लिंक आणि हानिकारक सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनही नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतात.
एखाद्या व्यक्तीने संशयास्पद लिंकवर क्लिक केले किंवा अनोळखी स्रोतावरून ॲप डाउनलोड केले, तर तिच्या मोबाइलमधील वैयक्तिक माहिती आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. काही परिस्थितींमध्ये मोबाइलचा गैरवापर करून बँकिंगशी संबंधित माहिती मिळवण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे अनोळखी मेसेजमधील सूचनांचे पालन करण्याऐवजी अधिकृत माध्यमातून माहिती तपासणे आवश्यक आहे. समजा, तुम्हाला व्हाट्सअँप वर बँक खात्यातून पैसे कापले गेल्याचा मेसेज आला, तर घाबरून त्याला उत्तर देण्याऐवजी तुमच्या बँकेच्या अधिकृत मोबाइल ॲपमधून व्यवहार तपासा. गरज असल्यास बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा.
सहर शेखच्या वडिलांची शिंदेसेनेत वर्णी? युनुस शेख यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यात राजकीय चर्चांना उधाण
मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून बँकेची वेबसाइट उघडणे किंवा संपर्क क्रमांक मिळवणे टाळा. तसेच, अनोळखी नंबरवरून आलेल्या संशयास्पद मेसेजला उत्तर देऊ नका, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि त्या लिंकच्या माध्यमातून कोणतेही ॲप डाउनलोड करू नका. तुमचा ओटीपी, युपीआय पिन, बँकिंग पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नका. मोबाइलमधील ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्स वेळोवेळी अपडेट ठेवा. नवीन ॲप डाउनलोड करताना त्याचा स्रोत विश्वासार्ह आहे का आणि ते कोणत्या परवानग्या मागत आहे, याचीही तपासणी करा.
तुमच्यासोबत ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा आणि सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक 1930 वर तक्रार नोंदवा. तसेच, भारत सरकारच्या अधिकृत राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल cybercrime.gov.in वरही तक्रार दाखल करता येते. त्यामुळे व्हाट्सअँपवर आलेल्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. विशेषतः बँक खात्यातून पैसे कापल्याचा दावा करणारा मेसेज आल्यास घाबरून किंवा घाईने कोणतीही कृती करण्याऐवजी अधिकृत माध्यमातून खातरजमा करा. डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहणे, संशयास्पद लिंकपासून दूर राहणे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे हाच सायबर फसवणुकीपासून बचाव करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे.