हनिमून संपताच पाकीट रिकामं?; लग्नापूर्वी अन् लग्नानंतर नवविवाहितांनी ‘बजेट’ मध्ये काय करावं?
Newly Married Couples जशी हनिमूनची धुंदी उतरते आणि संसाराचा गाडा रुळावर येतो, तेव्हा अनेक नवदाम्पत्यांना कळून चुकतं की...
Newly Married Couples Money Saving Tips : ”शादी का लड्डू जो खाए वो पछताए और जो न खाए वो भी पछताए” ही म्हण आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. पण आजच्या काळात या लाडू सोबत एक गोष्ट ‘फ्री’ मिळतेय, ती म्हणजे ‘रिकामा बँक बॅलन्स’. लग्नानंतरचे पहिले 3 ते 6 महिने स्वप्नवत असतात, पण जशी हनिमूनची धुंदी उतरते आणि संसाराचा गाडा रुळावर येतो, तेव्हा अनेक नवदाम्पत्यांना कळून चुकतं की, त्यांनी उत्साहाच्या भरात आपल्या कष्टाचा पैसा पाण्यासारखा वाहून नेला आहे. त्यामुळे जर तुमचंही नुकतंच लग्न झालं असेल किंवा होणार असेल, तर वेळीच सावध व्हा. नेमका पैसा कुठे वाया जातो आणि तो कसा वाचवावा, याबद्दलच्या खास टिप्स…
1. ‘हेवी’ शॉपिंगचा फास
लग्नाचं नाव निघताच मुलगा असो वा मुलगी, कपड्यांची जणू जत्राच भरते. मुली लाखो रुपये खर्चून भरजरी लेहेंगे आणि साड्या घेतात, ज्या लग्नानंतर कपाटातून बाहेर यायला पुढचं वर्ष उजाडतं. मुलंही ब्रँडेड सूट आणि महागड्या बुटांवर वारेमाप खर्च करतात. सहा महिन्यांनी जेव्हा कपाट उघडलं जातं, तेव्हा लक्षात येतं की, यातल्या निम्म्या गोष्टी आपण कधीच वापरल्या नाहीत.
2. दिखाव्यासाठी कर्जाचा डोंगर
आजकल सोशल मीडियाचा जमाना आहे. ‘इंस्टाग्राम रील्स’ आणि ‘फेसबुक फोटोज’वर आपण किती सुखी आहोत हे दाखवण्यासाठी अनेक कपल्स केड्रिट कार्ड स्वाइप करून किंवा लोन काढून महागडे इंटरनॅशनल ट्रिप्स प्लॅन करतात. पण 6 महिन्यांनी जेव्हा अव्वाच्या सव्वा EMI डोकं वर काढतात, तेव्हा खऱ्या अर्थाने संसाराचे चटके बसू लागतात.
3. घरासाठी ‘अनावश्यक’ खरेदी
नवा संसार थाटण्याच्या गडबडीत कपल्स अनेकदा अनावश्यक शो-पीस, महागड्या क्रॉकरी आणि असे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घेतात. ज्यांचा वापर वर्षातून एकदाही होत नाही. अनेकदा स्वस्तात मिळतंय म्हणून कमी दर्जाच्या वस्तू घेतल्या जातात, ज्या 3 ते ४ महिन्यांत खराब होतात आणि पुन्हा खर्च वाढतो.
4. बाहेरचं जेवण आणि ‘वीकेंड’ संस्कृती
लग्नाच्या सुरुवातीच्या काळात किचनमध्ये गॅस कमी पेटतो आणि हॉटेलचं बिल जास्त येतं. प्रत्येक वीकेंडला मुव्ही, पार्टी आणि बाहेरचं जेवण ही नवी फॅशन झाली आहे. पण महिन्याच्या शेवटी जेव्हा फूड ॲप्सचे बिल आणि हॉटेलचे खर्च समोर येतात, तेव्हा बचतीचा आकडा शून्यावर आलेला असतो.
लग्नानंतर बजेट कोलमडू नये म्हणून काय कराल?
महिन्याच्या सुरुवातीलाच ठरवा की, किती खर्च करायचा आणि किती बचत. प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवा. यासाठी बजेट डायरी बनवा. कोणतीही वस्तू घेताना स्वतःला विचारा “मला याची खरोखर गरज आहे की मला फक्त ती आवडली म्हणून मी घेतोय?” दिखाव्याच्या वस्तूंमध्ये पैसा अडकवण्यापेक्षा म्युच्युअल फंड, एसआयपी (SIP) किंवा सोन्यात गुंतवणूक करा. जेणेकरून भविष्यात तुमचं आर्थिक आयुष्य सुरक्षित राहील.