Talathi Bharati Exam : ज्याने पेपर फोडला, तो मुख्य आरोपीच झाला पास, गणेश गुसिंगेला 138 गुण

Talathi Bharati Exam : ज्याने पेपर फोडला, तो मुख्य आरोपीच झाला पास, गणेश गुसिंगेला 138 गुण

मुंबई : तलाठी भरती परीक्षेचा (Talathi Recruitment Exam) पेपर फोडणारा आरोपीच या परिक्षेत पास झाला असल्याची माहिती मिळत आहे. या आरोपीला तलाठी परीक्षेत 138 गुण मिळाले आहेत. गणेश गुसिंगे असं आरोपीचे नाव आहे. गणेश गुसिंगे (Ganesh Gusinge) यांचे नाव तलाठी भरती परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी चर्चेत आलं होतं. मात्र, आता त्याला या परीक्षेत138 गुण मिळाले असल्यानं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकारानंतर आता या परीक्षांच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गुरुवारी (ता. 17) तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात आली. नाशिकच्या म्हसरूळ केंद्रात हायटेक कॉपीचे प्रकरण समोर आले आहे. नाशिकला तलाठी परीक्षेत पेपर फोडल्याप्रकरणी गणेश गुसिंगे (28, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) याला ताब्यात घेण्यात आले. गुसिंगे याला परीक्षा केंद्राबाहेर पकडण्यात आलं होतं. त्याच्याजवळ एक वॉकीटॉकी, हेडफोन, दोन मोबाईल फोन संशयास्पदरीत्या सापडले. त्याचा साथीदार सचिन नैमाने आणि संशयित युवती संगीता रामसिंग गुसिंगे (21) हे दोघे गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले. सध्या याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं की, नाशिकमध्ये तलाठी भरतीचा पेपर फोडणाऱ्या गणेश गुसींगेला काल जाहीर झालेल्या #DMER परिक्षेत १३८ गुण आहेत, कदाचित त्याची निवड सुध्दा होऊ शकते. हाच गुसिंगे म्हाडा पेपरफुटीमध्ये आरोपी आहे आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरतीमध्ये फरार आरोपी आहे. अशी आपली परीक्षा व्यवस्था आणि पेपरफुटी कायदे आहेत, असं म्हणत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने रोष व्यक्त केला.

भगवद्गीता की संविधान असा प्रश्न विचारला तर…; शरद पोंक्षेंनी एका क्षणात सांगितलं 

या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्तांनी विशेष पथक नेमले आहे. पथकाने संशयित गणेश गुसिंगे याच्या मूळ गावी जाऊन घराची झडती घेतली. मात्र त्यात पोलिसांच्या हाती काय लागले, याची माहिती मिळू शकली नाही. म्हाडाचा पेपर आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचा पेपर फोडल्याप्रकरणी संशयित गणेश गुसिंगे याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या हाती लागला नाही.
दरम्यान, गुसिंगेने तलाठी भरतीचा पेपरही फोडला. त्याला 138 गुण मिळाल्यानं त्याची निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलीस प्रशासन त्याच्यावर काय कारवाई करते, हेच पाहणं महत्वांचं आहे.

गुसिंगे याने हे भरती घोटाळे केले
आरोपी गणेश गुसिंगे हा म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात फरार होता. त्याच्याविरोधात म्हाडा परीक्षा भरतीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2019 मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर याच गुसिंगेवर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube