दिंडोरीत पवारांचा डाव… जीवा पांडू गावितांची माघार : भास्कर भगरेसांठी केली लाखभर मतांची सोय
दिंडोरी : माकपचे उमेदवार जीवा पांडू गावित (J. P. Gavit) यांनी अखेर लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आहे. माकपच्या राज्य कमिटीने रविवारी (5 मे) गावित माघार घेतील अशी घोषणा केली होती. पण गावित यांनी मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगत आपली भूमिका सोमवारी स्पष्ट करू, असे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी आता लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे इथले उमेदवार भास्कर भगरे यांचा जीव भांड्यात पडला आहे. (CPM candidate Jeeva Pandu Gavitaya has finally withdrawn from Dindori Lok Sabha constituency.)
राज्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपाने महाराष्ट्रातील 48 जागांपैकी केवळ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा मागितली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस या तीन पक्षांनी परस्पर जागा वाटप केले. यात दिंडोरीतून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने भास्कर भागरे यांची उमेदवारी घोषित केली. शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर लोकसभा निवडणुकीत एक जागा मागूनदेखील न मिळाल्याने नाराज झालेल्या माकपाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती.
‘शिरुरची लोकं हुशार, एकदाच तिकीट घेतात नाटक फ्लॉप निघालं तर..’ फडणवीसांचे कोल्हेंना खोचक टोले
माकपच्या वतीने माजी आमदार जे. पी. तथा जीवा पांडू गावित यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावित यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले होते. यापूर्वी मालेगाव लोकसभा मतदारसंघातून 1999 मध्ये तर 2004, 2009 आणि 2019 मध्ये दिंडोरी मतदारसंघातून माकपच्या बंडखोरीमुळे मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली होती. त्यामुळे आघाडीच्या उमेदवाराचा पराभव आणि भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला होता. पण यंदा भाजपचा पराभव करायचा आहे, या उद्देशाने शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माकपाने एक पाऊल मागे येण्याचे ठरवले आहे. बंडखोरी अथवा मैत्रीपूर्ण लढत न करता महाविकास आघाडीलाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
माझ्यावर टीका करणारे पाच वर्ष फक्त शुटींगमध्येच व्यस्त…; आढळरावांची अमोल कोल्हेंवर टीका
नाशिकच्या उत्तर आणि पश्चिम भागात माकपची मोठी ताकद आहे. याच भागात जुना मालेगाव आणि आताचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ येतो. इथे माकपचे एक लाख मतदार आहेत. जुन्या मालेगाव मतदारसंघातून 1998 मध्ये जीवा पांडू गावित यांनी माकपच्या चिन्हावरुन 63 हजार मते घेतली होती. त्यानंतर 1999 मध्ये चिंतामन गावित यांनी 69 हजार मते मिळविली होती. त्यावेळी काँग्रेसचा अवघ्या 11 हजार मतांनी पराभव झाला होता. 2004 मध्येही जीवा पांडू गावित यांनी एक लाख 13 हजार मते घेतली होती. तर भाजप उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांचा अवघ्या चार हजार मतांनी विजय झाला होता.
2009 मध्ये दिंडोरी मतदारसंघ तयार झाल्यानंतरही गावित यांनी एक लाख मते घेतली होती. त्यावेळी हरिश्चंद्र चव्हाण यांना दुसऱ्यांदा 37 हजारांनी विजय झाला. 2019 मध्येही जीवा पांडू गावित यांनी एक लाख नऊ हजार मते घेतली होती. पण यंदा भाजपचा पराभव करायचा आहे, या उद्देशाने शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर माकपाने एक पाऊल मागे येण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे इथले उमेदवार भास्कर भगरे यांच्यसाठी किमान एक लाख मतांची तजबीज पवारांनी केल्याचे दिसून येते. याचा आता भाजपला कितपत फटका बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.