लोकसभेलाच शिंदे भाजपसमोर हतबल… विधानसभेला इच्छुकांना धोक्याची घंटा?

लोकसभेलाच शिंदे भाजपसमोर हतबल… विधानसभेला इच्छुकांना धोक्याची घंटा?

“आमच्यासोबत आलेला एकही पराभूत होणार नाही… झालो तर राजकारण सोडून शेती करायला निघून जाईन…” हे वाक्य होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे. 2022 मध्ये सत्तेत आल्यानंतर विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर झालेल्या आभाराच्या भाषणात शिंदे यांनी हे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर लोकसभेची (Lok Sabha Election) ही पहिलीच निवडणूक. त्यामुळे अनेकांच्या नजरा एकनाथ शिंदे काय करणार याकडे लागल्या होत्या, पण शिंदेंनी पहिल्याच निवडणुकीत भाजपसमोर (BJP) अक्षरशः लोटांगण घातल्याच दिसून येत आहे.

नवीन जागा मिळवणं लांबचं. ज्या तेरा जागा आहेत, त्या कायम ठेवतानाही शिंदेंना धडपड करावी लागत आहे. तीन खासदार पराभूत होण्यापूर्वीच निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत. स्वतःच्या मुलाचीही उमेदवारी अद्याप घोषित करता आलेली नाही. इतर खासदारांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. एकूणच हे चित्र आणि शिंदेंची ही हतबलता आता विधानसभेला जे आमदार सोबत आले आहेत, त्यांना आणि जे शिवसेनेकडून (Shivsena) तयारी करत आहेत त्यांना धोक्याची घंटा आहे का? पाहुया या व्हिडीओमधून.

सगळ्यात आधी बघू शिंदे भाजपसमोर हतबल कसे झाले आहेत…

जागा मिळवताना करावी लागणारी कसरत :

पूर्वी शिवसेना ज्या 23 जागा लढवत होती. त्या सर्व जागा शिंदेंना मिळणार नाहीत हे स्पष्ट होते. पण जे 13 खासदार सोबत आले आहेत त्या आणि ठाणे-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन जास्ती अशा किमान 15 जागा तरी मिळाव्यात अशी शिंदे यांची अपेक्षा होती. पण भाजपने शिंदेंना या जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. भाजपने शिंदेंना बारापेक्षा जास्त जागा देण्यास नकार दिला असल्याचे माहिती आहे. त्यामुळे ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपच लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

सोबत आलेल्या खासदारांच्या जागा ठेवण्यासाठीची धडपड :

सुरुवातीला शिंदेंचे खासदार असणाऱ्या  नाशिक, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, कल्याण अशा जागांवर भाजपने दावा ठोकला होता. यातील हिंगोली आणि यवतमाळ-वाशिम या जागा शिंदेंनी मिळावल्या. पण नाशिक आणि कल्याणची जागा मिळवण्यासाठी त्यांची अजूनही धडपड सुरुच आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी साताऱ्याची जागा भाजपला हवी आहे. त्याबदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. इथून छगन भुजबळ राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. यातून ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी भाजपचा आग्रह होता.

Congress Manifesto : महिलांना वार्षिक 1 लाख, 30 लाख नोकऱ्या; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?

वास्तविक ही जागा शिवसेनेकडे असताना ती भाजपने राष्ट्रवादीला देण्याची तयारी केली आहे, याचा सुगावा लागताच नाशिकचे हेमंत गोडसे थेट शिंदेंच्या घरी धडकले. सोबत नाशिकचे पदाधिकारी, कार्यकर्तेही घेतले. जागा सोडून नये म्हणून त्यांच्या निवासस्थानीच ठिय्या दिला. त्यानंतरही त्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांनी शिंदेंची भेट घेतली. पण अद्याप गोडसे वेटिंगवरच आहेत. कल्याणच्या जागेबाबतही भाजपने शिंदेवर दबाव टाकल्याचे बोलले जाते. कल्याण किंवा ठाणे दोन्हीपैकी एकच जागा मागा, अशी अट भाजपने टाकल्याचे सांगितले जाते.

उमेदवारांच्या निवडीमध्येही भाजपची ढवळाढवळ :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने सुरुवातीपासूनच देशभरातील उमेदवारांची अत्यंत काळजीपूर्वक निवड केली. शिवाय अबकी बार चारसो पारचा नारा देत मित्रपक्षांचे उमेदवार निवडण्यातही लक्ष घालायला सुरुवात केली. यातूनच भाजपने वेगवेगळ्या सर्व्हे आणि कामांचा हवाला देत रामटेकमधून शिवसेनेच्या कृपाल तुमाने आणि यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी यांचे तिकीट कापले. त्यांच्या जागी राजू पारवे आणि राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. तर हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी बदलण्यात आली. याच कारणांमुळे कल्याण, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघातू उमेदवारांची घोषणा झाली नसल्याचेही बोलले जाते.

शिंदेंची हतबलता विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याती घंटा?

महाराष्ट्रात लोकसभा झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यावेळीही भाजपकडून शिंदे यांना सन्मानजनक जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे. गतवेळी एका कार्यक्रमात बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला फक्त 48 जागाच येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर लगेचच असं काही झालेलं नाही, असं सांगत बावनकुळे यांनी सारवासारव केली. सोबतच व्हिडीओही डिलीट केला.

Chandrashekhar Bawankule : “तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नका”, बावनकुळे पटोलेंवर इतकं का चिडले?

मात्र लोकसभेच्या चित्रानंतर अनेक आमदारांना ही गोष्ट खरी वाटायला लागली आहे. विधानसभेलाही भाजप असाच प्रत्येक जागेवर दावा सांगेल का? सर्व्हे आणि अहवाल पुढे करत आपली उमेदवारी कापेल का? आपल्या उमेदवारीवेळीही भाजप असाच हस्तक्षेप करेल का? अनेक प्रश्न शिंदेंच्या बऱ्याच आमदारांना आणि विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांना पडू लागले आहेत. त्यामुळेच शिंदेंची आताची हतबलता विधानसभा निवडणुकीसाठीही धोक्याची घंटा आहे हे नक्की…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube