भाजप-मनसे युती : एकनाथ शिंदे अन् अजितदादांसाठी धोक्याची घंटा
अखेर मनसेचं इंजिन महायुतीला जोडलं गेलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. मुंबईतील सहा, ठाणे, कल्याण, पुणे (Pune) आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघांमध्ये मनसेची (MNS) मोठी ताकद आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भुमिकेने महायुतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण शिवसेना अन् राष्ट्रवादीला हा दिलासा तात्पुरताच ठरण्याची शक्यता आहे. लोकसभेला मनसेने एकही जागा मागितली नसली तरीही राज ठाकरे यांचा डोळा विधानसभा निवडणुकीवर आहे. तसं त्यांनी स्पष्टही केलं आहे आणि इथेच शिवसेना, राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मिळाली आहे. (Raj Thackeray Targets Legislative Assembly Elections Will Eknath Shinde and Ajit Pawar have a problem?)
नेमकी कशी? पाहुया सविस्तर…
मागच्या काही दिवसांपासून मनसेची महायुतीमध्ये एन्ट्री होऊ शकते असं चित्र होतं. राज ठाकरेंनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेटही घेतली होती. त्यावेळी भाजपने मनसेला तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. यातील पहिला प्रस्ताव म्हणजे लोकसभेला दोन जागा आणि विधानसभेला हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जागा. दुसरा प्रस्ताव होता लोकसभेला महायुतीला पाठिंबा आणि विधानसभेला सन्मानजनक जागा. तिसरा प्रस्ताव होता मनसेचे शिवसेनेत विलिनीकरण आणि राज ठाकरे अध्यक्ष.
यातील पहिला आणि तिसरा प्रस्ताव राज ठाकरे यांनी स्वतः गुढीपाडवा मेळाव्यात फेटाळून लावला. तर दुसऱ्या प्रस्तावावर म्हणजे लोकसभेला पाठिंबा आणि विधानसभेला सन्मानजनक जागा यावर त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नी फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. याचबरोबर मनसैनिकांना त्यांनी एक आदेशही दिला आहे. माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना हे सांगायचं आहे की, विधानसभेच्या तयारीला लागा… जोरात विधानसभेच्या तयारीला लागा… पुढच्या गोष्टी पुढे… आता कसलाही विचार न करता आपण पक्ष बांधणीचा विचार केला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला महाराष्ट्रभर भेटण्यासाठी लवकरच आपल्यासोबत येतो असंही त्यांनी सांगितलं आहे.
शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; साताऱ्यातून शशिकांत शिंदे, रावेरसाठी श्रीराम पाटील
याचा अर्थ महायुतीच्या लोकसभेच्या प्रचार सभांमध्ये राज ठाकरे आणि त्यांचे शिलेदार दिसू शकतात. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना बळ मिळेच पण यातून विधान सभा निवडणुकीसाठीची वातावरण निर्मिती करायची असे पक्के गणित राज ठाकरे यांच्या डोक्यात असणार आहे. थोडक्यात लोकसभेला महायुतीला पाठिंबा देण्याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करतील, असे सध्याचे चित्र दिसत आहे.
पक्षाच्या स्थापनेनंतर 2006 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 27 नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचे 13 आमदार निवडून आले होते. नाशिक महापालिकेत तर मनसेची सत्ताही आली होती. एका अर्थाने राज ठाकरे यांना मिळालेले मोठे यश होते. मात्र, त्यांना हे सातत्य टिकवता आले नाही. गत दोन लोकसभा निवडणुकीतून ठाकरेंनी माघार घेतली आहे. त्यानंतरच्या दोन विधानसभा निवडणुकांत मनसेचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला. सध्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत.
मुलाच्या पराभवासाठी बाप मैदानात; केरळमध्ये अनोखे पॉलिटिकल वॉर
आता महायुतीमध्ये येऊन आपले काही आमदार निवडून आणण्याचे राज ठाकरे यांनी ठरवलं आहे. पण ठाकरेंच्या या गणिताने एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या जागा वाटपामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांनाही म्हणावा तशा जागा मिळल्या नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या सेनेला आतापर्यंत दहा जागा मिळाल्या आहेत. त्यात रामटेक, यवतमाळ येथील विद्यमान खासदारांना तिकीट कापावे लागले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत केवळ रायगड, बारामती, धाराशिव आणि शिरुर या चारच जागा मिळालेल्या आहेत. त्यांच्या कोट्यातील परभणीची जागा रासपला देण्यात आली.
आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीबरोबर असल्यास त्यांना ही काही जागा द्यावा लागतील. लोकसभेलाच एका-एका जागेसाठी मारामारी असताना आता मनसेलाही जागा द्यावा लागणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादांना विधानसभेला देखील तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. त्यात एकनाथ शिंदे यांची ताकद असलेल्या ठाणे, कल्याण, नाशिकमधून मनसे जास्त जागा मागू शकते. कारण या भागात एकीकाळी मनसेला भरभरून ताकद मिळालेली आहे. त्यामुळे लोकसभेनंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.