भाजपसाठी सर्वात सेफ मतदारसंघ; पण सलग दोनवेळा विक्रमी मतांनी निवडून आलेला खासदारही आहे गॅसवर
मुंबई : 2014 आणि 2019 या दोन्ही मोदी लाटेत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले फार थोडे उमेदवार आपल्याला सांगता येतील. याच फार थोड्यामध्ये मुंबई उत्तर मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचे नाव घ्यावे लागते. 2014 मध्ये तब्बल चार लाख 46 हजार आणि 2019 मध्ये चार लाख 65 हजार असे विक्रमी मताधिक्य घेत शेट्टी यांनी दोनवेळा लोकसभा गाठली. दोन्हीवेळी काँग्रेसचा त्यांनी दारुण पराभव केला. आता ते तिसऱ्यांदा लोकसभा गाठण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पण केवळ शेट्टी होते म्हणूनच भाजपला एवढे मताधिक्य मिळाले का? तर तसेही नाही. शेट्टींच्या पूर्वीपासून हा मतदारसंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. 1989 पासूनच्या निवडणुकांमध्ये राम नाईक यांनी सलग पाचवेळा या मतदारसंघातून विजय मिळविला. तर 2004 साली त्यांचा अवघ्या पाच हजार मतांच्या फरकाने तर 2009 मध्ये 48 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. मात्र 2014 साली भाजपने दणदणीत मताधिक्य घेत हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेतला.
शिर्डी लोकसभेसाठी चुरस वाढली… महाविकास आघाडीकडून आणखी एका पक्षाची दावेदारी
पण भाजपचा मुंबई उत्तर मतदारसंघावर एवढा होल्ड का आहे? याचे उत्तर समजून घेण्यासाठी मतदारसंघाची रचना लक्षात घेणे गरजेचे आहे. बोरविली, दहिसर, कांदिवली पूर्वी, चारकोप, मागाठाणे आणि मालाड अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा मतदारसंघ बनला आहे. यातील बोरविलीमध्ये सुनील राणे, दहिसरमध्ये मनिषा चौधरी, कांदिवली पूर्वमध्ये अतुल भातखळकर आणि चारकोपमध्ये योगेश सागर असे भाजपचे चार आमदार आहेत. तर मागाठाणेमध्ये शिवसेनेचे प्रकाश सुर्वे आणि मालाडमध्ये काँग्रेसचे अस्लम शेख आमदार आहेत. याशिवाय मागाठाणेमधील प्रविण दरेकर हे विधानपरिषदेचे आमदारही भाजपकडे आहेत.
या मतदारसंघाची भौगोलिक रचना पाहिली तर हा मतदारसंघ मुंबईच्या उत्तरेला म्हणजेच गुजरातला लागून आहे. गुजरातला जाणाऱ्या रेल्वेमार्गालगत आणि महामार्गाला लागून हा मतदारसंघ वसला आहे. त्यामुळे सहाजिकच या मतदारसंघात गुजराती मतांची संख्या लक्षणीय आहे. याशिवाय उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक मतदारांचाही या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. त्यामुळेच संजय निरुपम यांच्यासारखा उत्तर भारतीय चेहराही इथून 2009 मध्ये विजयी होऊ शकला होता. त्यानंतर मराठी (आगरी, कोळी) आणि मुस्लिम, दलित असे मतांचे प्रमाण आहे. या मतदारसंघात कामगारांचेही प्रमाण मोठे आहे. याच गरीब आणि कष्टकरी कामगारांमुळे 1977 मध्ये काँग्रेल विरोधी लाटेत इथून मृणाल गोरे निवडून आल्या होत्या. पण त्यानंतर हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला तो गेलाच.
‘लोकसभे’साठी नितीश कुमारांचा नवा ‘डाव’; राष्ट्रीय कार्यकारिणीत ‘या’ खास शिलेदारांची एन्ट्री !
विभागनिहाय मतदारांचा प्रभाव पाहायचा तर दहिसरमध्ये आगरी, मराठी असा प्रभाव आहे. याशिवाय इथे आणि मागाठाणे, कांदिवली पूर्व या भागात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. बोरिवलीमध्ये गणपतनगर ही उत्तर भारतीयांचे मोठे प्रमाण असलेली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. नुकतेच या मतदारसंघातील भाजपमधील काही नेत्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. यात उत्तर भारतीय संघ, बजरंग दल अशा विविध संघटनांच्या स्थानिक प्रभावी नेत्यांचा समावेश होता. त्याच बरोबर गुजराती आणि मराठी असा वर्ग आहे. मालाड, मालवणी मुस्लिम आणि मराठी असा समाज आहे. काँग्रेसलाही इथला मतदार आपलेसे करतो. महानगरपालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक याच लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते.
आतापर्यंतच्या इतिहासात शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ कायम भाजपच्या वाट्याला आला आहे. तर महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येईल हे नक्की आहे. भाजपने इथून यापूर्वी सातवेळा राम नाईक यांना तर सलग दोनवेळा गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. त्याउलट काँग्रेसने मात्र 2009 आणि 2014 सालचा अपवाद वगळता जवळपास प्रत्येक निवडणुकीत उमेदवार बदलला आहे.
यंदा भाजपकडून पुन्हा एकदा गोपाळ शेट्टी यांनाच तिकीट मिळू शकते. पण दबक्या आवाज मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे त्यांचे बंधू विनोद शेलार यांना तिकीट मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काँग्रेसकडून मात्र पुन्हा नवीन नाव येण्याची शक्यता आहे. पण संजय निरुपम यांनी कोणत्याही परिस्थिती इथून पुन्हा एकदा लढणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळे उत्तर मुंबई या मतदारसंघात नेमके कोण वर्चस्व गाजवणार याचे उत्तर येत्या काही दिवसाच मिळून येईल.