कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती
कोल्हापूर : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज 23 डिसेंबर 2022 पासून कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या BF.7 व्हेरिएंटमुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.
याबाबत भाविकांना मात्र अद्यापतरी सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, मंदिरातील पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना आजपासून आता मंदिरात मास्क वापरावे लागणार आहे. तसेच सॅनिटायजर वापरण्याचं आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.
यासोबतच मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी प्रशासनही सतर्क झालं आहे. मुंबादेवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी मास्क लावावा असं आवाहन मुंबादेवी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दर्शनाला येताना मास्क लावणे सक्तीचे नाही, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता भक्तांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान चीनसह जगभरात कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढत आहे. त्यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे. चीनमध्ये नव्यानेच आढळून आलेला BF.7 या व्हेरिएंटने हेदौस माजवला आहे. या व्हायरसची भारतात देखील एंट्री झाली आहे. भारतात आतापर्यंत BF.7 चे चार रुग्ण आढळले आहेत. गुजरात आणि ओडिशात या व्हेरिएंटचे प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे.