Nashik graduate elections : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी 49.28 टक्के मतदान

Nashik graduate elections : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी 49.28 टक्के मतदान

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी एकूण 49.28 टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी दिलीय. नाशिक पदवीधर निवडणूकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे ही निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे.

नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. नाशिक विभागातील एकूण 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

तर 49.28 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आलीय. नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान झालं तर धुळे जिल्ह्यात 50.50 टक्के मतदान झालं आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात 51.44 टक्के मतदान झालं असून नाशिकमध्ये 45. 85 टक्के तर नंदुरबारमध्ये 49. 61 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलीय.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून उमदेवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यांनी सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी भरल्याने नवा ट्विस्ट या निवडणुकीत पाहायला मिळाला. तर दुसरीकडे भाजपकडून उमदेवार न देता सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती समोर आली होती.

सुधीर तांबे यांनी काँग्रेसशी दगाफटका केल्याचा आरोप ठेवत महाविकास आघाडीकडून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. असं असतानाही आपण काँग्रेसचेच उमेदवार असल्याचं सत्यजित तांबेंकडून सांगण्यात येत होते.

अखेर मतदानाच्या एक दिवस आधी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून सत्यजित तांबे यांनाच निवडून आणण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं.

या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर आज निवडणूक प्रक्रिया शांतेतत पार पडली असून नाशिक विभागात एकूण 49. 28 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीय.

दरम्यान, येत्या 2 तारखेला विधान परिषदेच्या पाचही विभागाचे निकाल हाती येणार असून नाशिक पदवीधर मतदारसंघात कोणाची वर्णी लागणार? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार हे 2 फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube