अकोले तालुक्यात 55 अल्पवयीन विवाहित मुली गरोदर, काहींची प्रसूतीही; अंगणवाडी सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव उघड

55 अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे उघड झाले आहे. यातील काही मुलींची प्रसूतीदेखील झाल्याची माहिती समोर.

  • Written By: Published:
Untitled Design 106

55 underage married girls pregnant : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि समाजमन हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. तालुक्यात तब्बल 55 अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे उघड झाले आहे. यातील काही मुलींची प्रसूतीदेखील झाल्याची माहिती समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून बालविवाह आणि अल्पवयीन मुलींच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अकोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांकडून दर महिन्याला गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे नियमित सर्वेक्षण केले जाते. याच सर्वेक्षणादरम्यान ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या ‘मातृत्व वंदना योजने’चा लाभ घेण्यासाठी दाखल झालेल्या अर्जांमध्येही या अल्पवयीन मुलींची नावे आढळून आली. त्यामुळे प्रशासन आणि महिला व बालविकास विभागात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, अनेक बालविवाहांची अधिकृत नोंदच होत नसल्याचे समोर येत आहे. सामाजिक दबाव, गावातील बदनामीची भीती आणि पोलिस कारवाईच्या धाकामुळे अनेक कुटुंबे ही प्रकरणे लपवून ठेवतात. विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये मुली पळून जाऊन लग्न करतील या भीतीने पालक अल्पवयातच त्यांचे विवाह लावून देत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, अल्पवयात गर्भधारणा झाल्यास मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्तक्षय, कुपोषण, प्रसूतीदरम्यान गुंतागुंत आणि माता-बाल मृत्यूचा धोका वाढतो. याशिवाय शिक्षण अर्धवट राहणे, आर्थिक परावलंबित्व आणि मानसिक तणाव यामुळे या मुलींचे संपूर्ण आयुष्य प्रभावित होत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांची सर्व 17 जागा लढवण्याची मोठी घोषणा

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाकडे या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरीय बाल संरक्षण समित्या सक्रिय करणे, विवाहाच्या वेळी वधू-वरांचे जन्मदाखले सक्तीने तपासणे, तसेच अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अकोले येथील बालसंरक्षण समितीचे अशासकीय सदस्य श्रीनिवास रेणुकादास यांनी केली आहे.

या घटनेमुळे प्रशासनासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. शासनाच्या विविध योजना आणि कायदे अस्तित्वात असतानाही ग्रामीण व आदिवासी भागांत बालविवाहाचे प्रमाण का कमी होत नाही? अल्पवयीन मुली गरोदर होईपर्यंत यंत्रणेला याची माहिती का मिळत नाही? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलींच्या शिक्षण व सुरक्षिततेबाबत समाज अजूनही किती मागे आहे, हे या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. आता या प्रकरणात प्रशासन, महिला व बालविकास विभाग, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस विभाग नेमकी कोणती कारवाई करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us