रोहित पवार मारिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात; अजित पवार अपघातप्रकरणी DGCA विरोधात गुन्हा दाखल?
व्हीएसआर कंपनीवर कारवाई करण्यास झालेल्या कथित उशिराच्या पार्श्वभूमीवर हा एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
A case registered against DGCA in Ajit Pawar accident case? : रोहित पवार आणि अमोल मिटकरी आज मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डीजीसीए विरोधात गुन्हा नोंदवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. व्हीएसआर कंपनीवर कारवाई करण्यास झालेल्या कथित उशिराच्या पार्श्वभूमीवर हा एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, जो घात झाला, जो अपघात झाला त्याची संपूर्ण माहिती समोर आली पाहिजे. दादांना न्याय मिळाला पाहिजे. ही केवळ आमचीच नाही, तर महाराष्ट्रातील सामान्य लोकांची भावना आहे. कोणी सोशल मीडियावरून, तर कोणी चहाच्या टपरीवरून या प्रकरणावर आवाज उठवत आहे.
ते पुढे म्हणाले, ज्या दिशेने तपास जायला हवा, त्या दिशेने तपास जात नाही. 28 जानेवारीला डीजीसीएने अहवाल दिला. त्या अहवालावर मी लवकरच सविस्तर बोलेन. दोन दिवसांत आणखी एक पत्रकार परिषद घेऊन काही महत्त्वाच्या गोष्टी समोर मांडणार आहे. रोहित पवार यांनी डीजीसीएवर व्हीएसआर कंपनीला क्लीन चीट दिल्याचा आरोप केला. तुम्ही दिखावा करत आहात की कारवाई केली.
मुंबईतील शाळा हायटेक होणार; शिक्षण विभागाकडून 4248 कोटींचा अर्थसंकल्प सादर
व्हीएसआर च्या पाच विमानांची उड्डाणे थांबवली, पण ही केवळ वरवरची कारवाई आहे. कंपनीच्या मालकावर थेट कारवाई झाली पाहिजे. डीजीसीएचे जे अधिकारी या विमानाशी संबंधित होते, त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, असे ते म्हणाले. याशिवाय, त्यांनी व्हीएसआर कंपनी आणि एका TDP नेत्यामधील आर्थिक संबंधांबाबतही प्रश्न उपस्थित केले. 28 तारखेलाच व्हीएसआर कंपनीला क्लीन चीट देण्याचा प्रयत्न झाला.
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा आरोपही त्यांनी केला. जो जबाबदार आहे, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आज आमचा एफआयआर घेतला नाही, तर उद्या बारामतीत लोकांसह पोलीस ठाण्यासमोर बसू. एफआयआर नोंदवला जाईपर्यंत उठणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.
दरम्यान, या सर्व आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील दोन दिवसांत रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
