महाराष्ट्रात भाजप अन् काँग्रेसला मिळणार नवे बॉस! निवडणुकांपूर्वी दिल्लीतून होणार मोठे बदल
मुंबई : महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना लवकरच नवे बॉस मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बदलांनंतर आता दोन्ही पक्षांच्या प्रभारीपदी नवीन चेहरा येणार आहे. त्यामुळे आगामी वर्षांत होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दोन्ही प्रमुख पक्ष नवीन प्रभारींच्या नेतृत्वात लढताना दिसणार आहेत. (A new face will come in charge of BJP and Congress in Maharashtra)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतीच केंद्रीय पदाधिकाऱ्यांची नवी यादी जाहीर केली आहे. यात राष्ट्रीय महासचिव असलेल्या सी. टी. रवी आणि दिलीप सैकिया यांना केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यांच्या जागी तेलंगाणा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार आणि उत्तर प्रदेशचे खासदार राधामोहन अग्रवाल यांची वर्णी लागली आहे. सी. टी. रवी हे सध्या महाराष्ट्र भाजपचे प्रभारी आहेत. मात्र आता त्यांना भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याने प्रभारीपदीही नवीन चेहरा येणार आहे.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? अजितदादांच्या गटातील नेत्याच्या उत्तराने खळबळ!
तर महाराष्ट्र काँग्रेसचे सध्याचे प्रभारी एच. के. पाटील हे आहेत. मात्र त्यांची कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. काँग्रेसच्या एक व्यक्ती एक पद या नियमानुसार आता पाटील यांच्याजागीही काँग्रेसला प्रभारी म्हणून नवा चेहरा द्यावा लागणार आहे. पाटील यांच्या आधी 2018 मध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनंतर आता निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस कोणाच्या हाती सुत्र सोपविणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
BJP : दोन महिन्यांची सुट्टी दिल्लीतून नामंजूर! मुंडे अन् तावडेंना पुन्हा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी
तावडे, मुंडेंनाही संधी :
यात महाराष्ट्रातून राष्ट्रीय महासचिवपदी विनोद तावडे यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर दोन महिने सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे यांनाही दुसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह विजया राहटकर यांना राष्ट्रीय सचिव म्हणून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर यापूर्वी महाराष्ट्रातून असलेलं सुनील देवधर यांचं नाव वगळण्यात आलं आहे.